BJP : दोन महिन्यांची सुट्टी दिल्लीतून नामंजूर! मुंडे अन् तावडेंना पुन्हा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी

BJP : दोन महिन्यांची सुट्टी दिल्लीतून नामंजूर! मुंडे अन् तावडेंना पुन्हा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी नुकतीच केंद्रीय पदाधिकाऱ्यांची नवी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून राष्ट्रीय महासचिवपदी विनोद तावडे (Vinod Tawade) यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर दोन महिने सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही दुसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह विजया राहटकर यांना राष्ट्रीय सचिव म्हणून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर यापूर्वी महाराष्ट्रातून असलेलं सुनील देवधर यांचं नाव वगळण्यात आलं आहे. (Vinod Tawde and Pankaja Munde have been given responsibility at the national level by the BJP)

पंकजा मुंडे दोन महिन्यांच्या सुट्टीवर :

या महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 7 जुलै रोजी पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे यांनी भाजपमधील आपली नाराजी व्यक्त केली होती. तसंच दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाण्याची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे त्या मागील काही दिवसांपासून सार्वजनिक जीवनातून लांब आहेत. त्या समाजमाध्यमांवरही फारशा सक्रिय नाहीत. याशिवाय त्यांनी राजकीय कार्यक्रमांना जाण्याचं टाळलं आहे.

मात्र भाजपकडून त्यांना ही सुट्टी मंजूर झालेली दिसत नाही. पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या भाजपच्या प्रभारी आहेत. या ठिकाणी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या धामधुमीच्या काळात पंकजा यांनी सुट्टीवर जाऊ नये, यासाठी भाजपचे हे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. यामुळे त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली असण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे, तावडेंचं पुनर्वसन होणार?

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर दोघांचेही संघटनेमध्ये राष्ट्रीय पातळीवर पुनर्वसन करण्यात आलं. तावडे यांना आधी राष्ट्रीय सचिव आणि काही दिवसांतच राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी दिली. याशिवाय चंदीगड आणि बिहारचे प्रभारीपद त्यांच्याकडे देण्यात आलं.

तर पंकजा मुंडे यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली. तसंच त्यांची मध्यप्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता दोघांनाही पुन्हा या पदांवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता दोघांचेही संसदीय पुनर्वसन देखील होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube