Video : ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाकडून शिंदेच्या आमदाराचं स्टिंग ऑपरेशन; व्हिडिओ पोस्ट केल्याने उडाली खळबळ

या प्रकारासंबंधी व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

News Photo   2026 06 27T160011.262

कोल्हापूर ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख (NEET) रवीकिरण इंगवले यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकत शिवसेनेचे नेते आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. तब्बल वर्षभरापूर्वीच्या घटनेचा उल्लेख करत टक्केवारीतून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. याबाबत संबंधित व्यक्तीने पाच टक्क्यांच्या हिशोबानं ४० लाख रुपये आमदार राजेश क्षीरसागर यांना दिल्याचा उल्लेख केला आहे.

संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. व्हिडिओवरून सध्या कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ माजला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत, आमदार क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचाराचे, खंडणीचे आणि दमदाटीचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; महाटीईटीची परीक्षा आता नव्या तारखेला

टेंडरमधील कमिशन आणि टक्केवारीचा व्यवहार मोडल्यानंतर समोरच्याला कोणत्या पातळीवर जाऊन वागणूक दिली जाते, याचे हे जिवंत उदाहरण आहे असं इंगवले यांनी यात म्हटलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रविकिरण इंगवले यांनी या व्हिडिओचा हवाला देत आमदार क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीवर सडेतोड भाष्य केले आहे.

इंगवले म्हणाले, “एखाद्या शासकीय किंवा विकासकामाच्या टेंडरमधील पैसे खाताना, जर ठरल्याप्रमाणे कमिशन किंवा टक्केवारी मिळाली नाही, तर हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, हे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. व्यवहार फिस्कटल्यावर समोरच्या व्यक्तीला कशा प्रकारे छळले जाते आणि कशी वागणूक दिली जाते, याचा हा पर्दाफाश आहे सध्याचा व्हिडिओ हा कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरचा आहे. या व्हिडिओवर 25 ऑक्टोंबर 2025 ची तारीख आहे. या व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर दिसत आहेत. तर संबंधित व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आहे. या व्हिडिओमध्ये जवळपास सात टक्क्यांचे संभाषण आहे.

यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांना ५ टक्के तर उर्वरित राहुल आणि प्रशांतला प्रत्येकी १ टक्के असे देण्याचे नियोजन असल्याचे संभाषण आहे. 5 टक्क्यां प्रमाणे आमदार राजेश क्षीरसागर यांना 40 लाख रुपये दिल्याची माहिती या संभाषणामध्ये दिली आहे. तर राहुल ला अकाउंटवर पैसे दिल्याचेही कबूल केले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर व्यवहार मान्य नसल्याचा संभाषण देखील संबंधित व्यक्तीकडून झाले आहे.

हा कथित व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी संबंधित प्रकारची चौकशी व्हावी. आमदार क्षीरसागर यांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे याबाबत तक्रार दाखल करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना याबाबत विचारले असता, या व्हिडिओबाबत लवकरच माझी प्रतिक्रिया देईन असे स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भात उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करेन.

follow us