जाहिरातीची धास्ती अन् दिल्लीतून फोन : फडणवीसांच्या ट्विटचं कारण ठाकरेंनी सांगितलं
मुंबई : शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारे ट्विट एक दिवस आधीच केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना (UBT) च्या निशाण्यावर आले आहेत. घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीहून फोन आला असावा आणि त्यांनी ते ट्विट केलं असाव, असं म्हणतं शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते शिवसेना (UBT) च्या महाशिबीरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना बोलत होते. (Aditya Thackeray Slam Devendr Fadnavis ove one day before shivsena vardhapan din tweet)
आदित्य ठाकरे म्हणाले, उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, पण काही लोकांनी एका जाहिरातीची इतकी धास्ती घेतली की, उद्याच्या वर्धापन दिनाचं आजच ट्विट करून टाकलं आहे. या घटनाबाह्य सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांनी उद्याच्या शुभेच्छा आजच देऊन टाकल्या आहेत. कदाचित दिल्लीहून निरोप आला असेल की आजच ट्वीट करा अन्यथा पाहा, अशी दटावणी केली असावी, असही ठाकरे म्हणाले.
फडणवीसांकडून ट्विट पोस्ट अन् डिलीट :
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र चूक लक्षात येताच ते ट्विट डिलीट केले. यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर खऱ्या अर्थाने वाटचाल करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा असे फडणवीस म्हणाले होते. याच ट्विटवर ठाकरेंनी निशाणा साधला.
20 तारखेला जागतिक खोके दिन :
यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करत, 20 जून हा जागतिक खोके दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचं म्हंटलं. ते म्हणाले, परवा म्हणजे २० तारखेला सर्वात महत्वाचा दिवस आहे. जागतिक खोके दिन. राष्ट्रीय नाही जागतिक आहे. कारण त्यांची 33 देशांनी दखल घेतली आहे, असा हा दिवस आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना त्यांच्या लंडन प्रवासादरम्यानचा मजेशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले, परवा लंडनमध्ये होतो. तिथे एक मित्र भेटला. त्याने विचारलं की आता शिवसेनेचा पुढचा कार्यक्रम काय आहे वगैरे. त्यावर मी त्याला सांगत होतो की 18 तरखेला आमचं शिबीर आहे, १९ तारखेला वर्धापनदिन आणि २० तारखेला 50 खोके इतकं बोललो तर बाजूला एक फॉरेनर होता तो देखील म्हणाला “एकदम ओक्के’, यावर सभागृहात एकच हशा पिकला.