महायुतीचा आवाज जिल्ह्यानंतर सहा विभागांमध्येही घुमणार! प्रसाद लाड यांनी सांगितला मास्टर प्लॅन

महायुतीचा आवाज जिल्ह्यानंतर सहा विभागांमध्येही घुमणार! प्रसाद लाड यांनी सांगितला मास्टर प्लॅन

मुंबई : मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला (14 जानेवारी) रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण 36 ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह महायुतीतील एकूण 15 पेक्षा अधिक घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय जिल्हा पातळीवर हे मेळावे पार पडले. आता यानंतर विभागीय पातळ्यांवरही महायुतीचे मेळावे घेण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली. (After 36 districts, Mahayuti meetings will also be held at divisional levels)

आमदार लाड म्हणाले, काल महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यात महायुतीचे हे मेळावे एकाच दिवशी पार पडले. या मेळाव्यानंतर महाविकास आघाडीची हवा निघून गेली असून, महाराष्ट्रात महायुती किती अभेद्य आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ‘महाविजय 2024’ साध्य होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अंत्योदयाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणे, ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे.

येत्या काळात महायुतीचे सहा विभागीय स्तरावर मेळावे :

येत्या काळात महायुतीचे सहा विभागीय स्तरावर महामेळावे होतील. नागपूर, अमरावती, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश अशा सहा विभागात मेळावे होतील. या मेळाव्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील नेते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यांनंतर निवडणुकांमध्ये लोकसभेला जो उमेदवार दिला जाईल, तो महायुतीचा उमेदवार असेल, आम्ही महायुतीचा उमेदवार म्हणून येणारी निवडणूक लढू आणि त्याला जिंकून आणू, असेही आमदार लाड यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

36 जिल्ह्यांमध्ये पार पडले महायुतीचे मेळावे :

आगामी लोकसभेच्या अनुषंगाने राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये महायुतीच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीतील सर्व घटकपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि मंत्र्यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. लोकसभेला महाराष्ट्रात महायुतीचे 45 पेक्षा जास्त खासदारांना निवडून आणणे हे लक्ष्य या मेळाव्यांच्य माध्यमातून ठेवले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज