अंबादास दानवेंची खुर्ची धोक्यात; विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरही काँग्रेसचा दावा
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदानंतर आता काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरही दावा ठोकला आहे. काँग्रेसच्या 9 पैकी 6 आमदारांनी याबाबत थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच उपसभपती नीलम गोऱ्हे यांच्याकडे यासाठी दावा करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनीही या ‘लेट्सअप मराठीशी’ बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. (After the Leader of the Opposition in the Legislative Assembly, now the Congress is also claiming the Leader of the Opposition in the Legislative Council)
महाविकास आघाडीत सध्या विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत. सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना (ठाकरे गट) 8, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 4 तर काँग्रेसचे 9 आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडापूर्वी शिवसेनेचे 11 आमदार होते. तर बंडानंतर विप्लव बाजोरिया वगळता सर्व आमदार ठाकरेंसोबत कायम राहिले. त्यामुळे ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांची विरोधी पक्ष नेतेपदावर वर्णी लागली. मात्र नंतरच्या काळात मनिषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
यानंतर ठाकरेंची संख्या 8 पर्यंत खाली आली. त्यामुळेच काँग्रेसने आपले संख्याबळ जास्त असल्याचा दावा करत आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा ठोकला आहे. विधान परिषदेत काँग्रेसचे अधिकृत 8 तर नागपूर शिक्षकचे आमदार सुधाकर अडबाले हे काँग्रेस पुरस्कृत आहेत. याच 9 जागांच्या बळावर काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपदावर दावा ठोकला आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार :
राष्ट्रवादीत अजित पवार बंडानंतर दोन गट पडले. बहुतांश आमदारांनी अजितदादांसह सत्तेची कास धरली. राष्ट्रवादीनंतर काँग्रेचे संख्याबळ जास्त असल्याने नुकतीच विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेतेपदावर वर्णी लागली. त्यापाठोपाठ आता विधान परिषदेच्याही विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसचा डोळा आहे. काँग्रेस आमदारांच्या या दाव्यामुळे आता ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची खुर्ची धोक्यात आली आहे. याबाबत आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.