ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सैन्यदलाकडून ‘भीम’ रणगाडा भेट; राळेगणसिद्धीत दाखल होताच अण्णा भावुक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भारतीय संरक्षण विभाग आणि सैन्यदलाकडून टी-55अर्थात ‘भीम’ रणगाडा भेट देण्यात आला.

  • Written By: Published:
Untitled Design 29 1

Anna Hazare gifted ‘Bhim’ tank by the Army : अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी आज एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरली. देशसेवा आणि समाजसेवेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भारतीय संरक्षण विभाग आणि सैन्यदलाकडून टी-55अर्थात ‘भीम’ रणगाडा भेट देण्यात आला. सैन्यदलातील त्यांच्या योगदानासह ग्रामीण विकास आणि समाजपरिवर्तनासाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून हा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

राळेगणसिद्धी येथे रणगाडा दाखल होताच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी जल्लोषात आणि अभिमानाने या रणगाड्याचे स्वागत केले. भारतीय सैन्याच्या इतिहासाची साक्ष देणारा हा रणगाडा आता राळेगणसिद्धीच्या भूमीवर कायमस्वरूपी जतन केला जाणार आहे. अण्णा हजारे यांना औपचारिकरित्या रणगाडा सुपूर्द करण्यात आल्यानंतर उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. अनेक दशकांपूर्वी सैन्यदलात चालक म्हणून सेवा बजावणाऱ्या अण्णांच्या डोळ्यांतही यावेळी आठवणी दाटून आल्याचे पाहायला मिळाले.

अण्णा हजारे यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात भारतीय सैन्यातून देशसेवा करत केली. सीमावर्ती भागात सेवा बजावत असताना त्यांनी शिस्त, त्याग आणि राष्ट्रसेवेचे धडे घेतले. सैन्यातील सेवेनंतर त्यांनी आपल्या गावाकडे परतत समाजपरिवर्तनाचा ध्यास घेतला. दुष्काळ, बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेच्या समस्यांनी ग्रासलेल्या राळेगणसिद्धीला त्यांनी लोकसहभागाच्या माध्यमातून विकासाचा नवा मार्ग दाखवला.

आम्ही मृतदेहाचे लिंग..,; प्रणितच्या शोमध्ये महिला डॉक्टर बरळली, नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली!

पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षसंवर्धन, ग्रामसभा सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आणि पारदर्शक प्रशासन यांसारख्या उपक्रमांमुळे राळेगणसिद्धी हे गाव देशभरात आदर्श ग्रामविकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कार्यामुळे हजारो गावांना प्रेरणा मिळाली आणि ग्रामीण विकासाचा नवा अध्याय लिहिला गेला. याचबरोबर भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातूनही अण्णा हजारे यांनी देशभरात जनजागृती घडवून आणली. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचे योगदान आजही अनेकांसाठी प्रेरणादायी मानले जाते. त्यामुळेच संरक्षण विभागाने त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि राष्ट्रसेवेच्या भावनेचा गौरव करण्यासाठी हा अनोखा सन्मान देण्याचा निर्णय घेतला.

रणगाडा राळेगणसिद्धीत पोहोचल्यानंतर अण्णा हजारे यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून संपूर्ण गावाचा आणि देशसेवेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा असल्याची भावना व्यक्त केली. सैन्यदलाने दिलेली ही भेट राष्ट्रसेवा आणि समाजसेवा यांचा संगम असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, राळेगणसिद्धीत उभारण्यात येणाऱ्या विशेष ठिकाणी हा ‘भीम’ रणगाडा जतन केला जाणार असून भावी पिढ्यांना देशभक्ती, त्याग आणि समाजसेवेची प्रेरणा देणारे स्मारक म्हणून तो ओळखला जाणार आहे. देशाच्या संरक्षणासाठी वापरण्यात आलेला रणगाडा आणि समाजपरिवर्तनासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या अण्णा हजारे यांचा प्रवास यामुळे हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून राष्ट्रसेवा आणि लोकसेवेच्या मूल्यांचा गौरव ठरत आहे.

follow us