Appasaheb Pawar Sad Demise : मराठा आरक्षणासाठी सातत्याने धडपड करणारे नेतृत्व हरपलं!

Appasaheb Pawar Sad Demise : मराठा आरक्षणासाठी सातत्याने धडपड करणारे नेतृत्व हरपलं!

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सातत्याने धडपड करणारे तसेच प्राणपणाने लढणारे मराठा महासंघाचे (Maratha Mahasangha) राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत तथा आप्पासाहेब पवार (Shashikant Pawar) (वय ८२) यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri) येथे मराठा बिझनेसमेन फोरमच्या (Maratha Business Forum) बैठकीसाठी ते परवा मुंबईहून (Mumbai) तेथे गेले होते. मंगळवारी सांयकाळी तेथून परत येत असताना वाटेत पाली परिसरात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीना त्यांना खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी तसेच दोन मुले वीरेंद्र व योगेश, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दादर येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११ वाजता निघणार आहे.

मराठा समाजाच्या हिताचा विचार करणारे नेतृत्त्व हरपले : देवेंद्र फडणवीस
मराठा महासंघाचे नेते ॲड. शशिकांत पवार यांच्या निधनाने मराठा समाजाप्रति समर्पित आणि कायम अग्रेसर राहणारा नेता आपण गमावला आहे. अ. भा. मराठा महासंघाची स्थापना होत असताना स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या अतिशय जवळच्या सहकार्‍यांमध्ये त्यांचा समावेश होता. कायम सुस्पष्ट भूमिका आणि मराठा समाजाच्या हिताचा विचार त्यांनी केला. त्यांचे संघटनकौशल्य आणि जनसंपर्क अफाट असाच होता. मराठा समाजाच्या हितांचा विचार करणारा एक अग्रेसर नेता त्यांच्या निधनाने हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्वच सहभागी आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्व हरपलं : अजित पवार
मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनानं मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाने मराठा समाजाच्या हितासाठी तळमळीने काम करणारा नेता हरपला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

आप्पासाहेंबांच्या निधनाने मराठा समाजाची मोठी हानी : तावडे
माझे स्नेही आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांचं दुःखद निधन ही मराठा समाजाची मोठी हानी आहे. मराठा समाजाला मानाचे स्थान आणि मराठा आरक्षण मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पवार कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहोत, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tavde) यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube