धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
रोजगार, व्यापार आणि आरोग्य सेवांसाठी होणाऱ्या दैनंदिन प्रवासालाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत (Railway) सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणाऱ्या धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाच्या (सुमारे २४० कि.मी.) सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर राज्य शासनाशी समन्वय, नीती आयोग, अर्थ मंत्रालय तसेच इतर संबंधित विभागांच्या मंजुरीनंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांवर निर्णय घेतला जाणार आहे. रेल्वे प्रकल्पांची मंजुरी ही तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय प्रक्रियेतून टप्प्याटप्प्याने दिली जात असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील संपर्क अधिक सक्षम होणार असून मराठवाड्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर परिसरातील शेंद्रा–बिडकीन औद्योगिक क्षेत्र, ऑरिक, ऑटोमोबाईल, ईव्ही, अभियांत्रिकी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन कच्चा माल, कंटेनर, तयार उत्पादने तसेच कृषी मालाची वाहतूक अधिक जलद आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल.
याशिवाय भविष्यात हा रेल्वेमार्ग उत्तर–दक्षिण रेल्वे कॉरिडॉरचा महत्त्वाचा दुवा बनू शकतो. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि दक्षिण भारताशी छत्रपती संभाजीनगरची रेल्वे जोडणी अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना पर्यायी आणि कमी अंतराचे रेल्वे मार्ग उपलब्ध होतील, तर धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणेही अधिक सुलभ होईल. शिक्षण, रोजगार, व्यापार आणि आरोग्य सेवांसाठी होणाऱ्या दैनंदिन प्रवासालाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.