अशोक सराफ दक्षिणेत असते, तर आज मुख्यमंत्री असते : राज ठाकरे

अशोक सराफ दक्षिणेत असते, तर आज मुख्यमंत्री असते : राज ठाकरे

पुणे : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अशोक सराफ यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेमध्ये असती, तर ते आज मुख्यमंत्री असते.

ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो त्याने आपण त्याला आवडतो हे सांगणे आनंद देणारे आहे. समोर कुणीही असो अशोक सराफांना फरक पडला नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

आजही अशोक सराफ यांचे नाव घेतल्यानंतर सभागृह तुडुंब भरते. इतकी वर्षे एखादा कलावंत काम करतो. अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री राहिले असते. त्यांच्या 40 – 40 फूट कटावेजवर दुग्धभिषेक झाला असता. आपल्याकडे प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत, राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, मला आज कळलं तुमचं मूळ घराणं बेळगावचं. त्यामुळे तुम्हीच सीमाप्रश्न सोडवला, असं मला वाटतं. ते म्हणाले, मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणसे राहिली नाहीत. त्यामुळे आमच्यासारख्यावर आटोपयला लागत. हाच कार्यक्रम जर युरोपात असता तर त्या देशाचे पंतप्रधान कार्यक्रमात हजर राहिले असते.

राज ठाकरे म्हणाले, ”हे लोक आपल्या आयुष्यात नसते तर आपलं काय झालं असतं. हा दागिना फक्त सराफाच्या घरीच मिळू शकतो.” दरम्यान, सत्कारानंतर अशोक सराफ यांनी राज ठाकरे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube