विश्लेषण : पवार कुटुंबातील चौथ्या पिढीतील नेत्यांच्या विधानांचा ‘राजकीय’ अर्थ काय?

Jay Vs Yugendra Pawar दादांनंतर बारामतीच्या नेतृत्वावरून निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आतापासूनच अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

  • Written By: Published:
विश्लेषण : पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेत्यांच्या विधानांचा 'राजकीय' अर्थ काय?

Baramati Jay Vs Yugendra Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर होत असलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी आज (दि.23) मतदान पार पडत आहे. मात्र, आजचा चर्चेचा विषय ‘मतदान’ नसून, पवार कुटुंबातील चौथ्या पिढीने 2029 च्या निवडणुकांबाबत केलेली विधाने ठरली आहेत. रोहित पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्यातील शाब्दिक युद्धातून बारामतीच्या भविष्यातील संघर्षाची अधिकृत ठिणगी पडली आहे. नेमकं आजच्या विधानांचा राजकीय अर्थ काय निघतो ते बघूया…

जय पवारांची चूक नाही, तो दादांचा मुलगा; 2029 विधानसभा निवडणुकीवर नेमकं काय म्हणाले श्रीनिवास पवार ?

1. रोहित पवारांचे भाकीत : “पुन्हा पवार वि. पवारच”

आमदार रोहित पवार यांनी आजच्या पोटनिवडणुकीपेक्षा 2029 च्या लढतीवर जास्त लक्ष वेधले. जर सुनेत्रा काकी निवडणुकीला उभ्या राहिल्या नाहीत, तर बारामतीत 2029 मध्ये पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ म्हणजेच जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे, असे खळबळजनक विधान रोहित पवारांनी केले.रोहित पवारांनी हे विधान करून एकप्रकारे बारामतीवर शरद पवार गटाचाच दावा राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

2. जय पवारांची ‘वेट अँड वॉच’ भूमिका

दुसरीकडे, जय पवार यांनी रोहित पवारांच्या या भाकितावर थेट उत्तर देणे टाळले असले तरी आपली महत्त्वाकांक्षा दडवून ठेवली नाही. ते म्हणाले की, 2029 मध्ये मी विधानसभेचा उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जय पवारांनी ‘कार्यकर्त्यांची इच्छा’ असे म्हणत स्वतःची दावेदारी 2029 साठी जिवंत ठेवल्याचे राजकीय अर्थ अनेकजण व्यक्त करत आहेत.

“घरात घुसून मारेन!”; ऑडिओ क्लिप व्हायरल होताच संजय गायकवाडांचा जुना ‘ट्रॅक रेकॉर्ड’ चर्चेत!

3. युगेंद्र पवारांचा सावध पवित्रा: “संघर्ष नको, पण…”

शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी रोहित पवारांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बारामतीत 2029 मध्ये जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते असं जे रोहित पवार म्हणाले ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. यापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असं एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख आहे. आम्हाला ते परत करायचं नाहीये. आम्हाला एकमेकांविरोधात लढायचं पण नाहीये आमची तशी इच्छापण नाहीये. सध्या आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहणं महत्त्वाचं आहे. जरी युगेंद्र पवारांनी संघर्षाचा इन्कार केला असला, तरी त्यांनी 2029 च्या निवडणुकीत आपण उभे राहणार नाही, असे स्पष्टपणे कुठेही म्हटले नाही. “आता संघर्ष नको” असे म्हणत असतानाच त्यांनी भविष्यातील राजकीय पर्यायांचे दार पूर्णपणे बंद केलेले नाही. त्यामुळे, जर विचारधारेची लढाई म्हणून वेळ आलीच, तर युगेंद्र पवार पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतात, असे संकेत त्यांच्या विधानातून मिळतात. Baramati Jay Vs Yugendra Pawar

4. श्रीनिवास पवारांची ‘नाराजी’ आणि ‘समज’

अजित पवारांचे बंधू आणि रोहित पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी या सर्व तरुण पिढीच्या विधानांवर भाष्य केले ते म्हणाले की, आज बारामतीत मतदानाचा दिवस आहे, 2029 च्या चर्चा करण्याची ही वेळ नाही. त्यावेळी कोणत्या पक्षाची काय परिस्थिती असेल आणि एकत्र कोण लढणार? कोण कोणाच्या विरोधात लढणार? युती होणार, नाही होणार, विलीनीकरण होणार, नाही होणार, तीन वर्ष हा खूप मोठा काळ आहे, त्यामुळे त्यावर आता भाष्य करणं मलाही योग्य वाटत नसल्याचे ते म्हणाले. तसेच रोहित आणि जय या दोघांनीही अशा प्रकारे विधाने करायला नको होती, अशा शब्दांत त्यांनी कुटुंबातील ज्येष्ठ म्हणून नाराजी व्यक्त केली. मी वडील आहे पण निर्णय तो घेईल, ही नवीन पिढी आहे. सर्व राजकीय निर्णय तो घेणार, नवीन पिढीला वडिलांचे विचार घेईल हे जरुरी नाही. साहेबांनी जर ठरवलं, तेव्हा पक्षातर्फे कोणाला उभं करायचं तेच फायनल होईल, असंही पुढे श्रीनिवास पवार म्हणाले.

राजकीय अँगलने या विधानांचा काय अर्थ निघतो?

1. सत्तेचा केंद्रबिंदू ‘बारामती’च राहणार : अजित पवारांच्या अकाली निधनानंतर बारामतीच्या नेतृत्वावरून निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे बोलले जात आहे. 2029 चा उल्लेख होणे म्हणजे दोन्ही गटांनी आतापासूनच ‘अस्तित्वाची लढाई’ म्हणून तयारी सुरू केली आहे.

2. तिसऱ्या पिढीचा संघर्ष चव्हाट्यावर : लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झाला होता, मात्र आता या संघर्षाचा केंद्रबिंदू रोहित, जय आणि युगेंद्र या तरुण पिढीकडे सरकल्याचे चित्र आजच्या विधानांवरून अधोरेखित होत आहे. तसेच भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? याचा फैसला बारामतीतच होईल, हे देखील स्पष्ट होत आहे.

तनपुरे, रोहित पवारांची सुटका कोर्टाच्या एका निकालानं विरोधकांच्या हातून ‘सूडाचं’ मोठं शस्त्र गेलं!

3. शरद पवारांची भूमिका निर्णायक : रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी केलेल्या विधानांवर आता बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवार कोणत्या ‘पवारांना’ मैदानात उतरवतात, याकडे आता राज्याचे लक्ष असेल.

4. महायुती आणि महाविकास आघाडीवर परिणाम :
बारामतीतील या वादाचा परिणाम केवळ एका मतदारसंघावर मर्यादित राहणार नाही. राष्ट्रवादीचे दोन्ही गट महायुती आणि मविआमध्ये महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील हा संघर्ष राज्याच्या सत्ता समीकरणांना 2029 पर्यंत अस्थिर ठेवू शकतो असे मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

त्यामुळे आजची पोटनिवडणूक ही केवळ औपचारिकता वाटत असली, तरी त्यातून 2029 च्या महासंग्रामाची नांदी झाली असून, पवार कुटुंबात विलीनीकरण की पुन्हा रणकंदन? या प्रश्नाचे उत्तर आजच्या विधानांनी अधिकच गुंतागुंतीचे करून ठेवले आहे हे मात्र नक्की.

follow us