Bhagat Singh Koshari : आता राज्यपालांना करायचंय मनन, चिंतन; कोश्यारी राजीनामा देणार

Bhagat Singh Koshari : आता राज्यपालांना करायचंय मनन, चिंतन; कोश्यारी राजीनामा देणार

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) चर्चेत आले होते. त्यांच्या या वक्यव्याचा अनेकांनी निषेध देखील केला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा यासाठी महाविकास आघाडीने मोर्चा देखील काढला होता.

यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा (Governor resigns) देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे, अशी माहिती राजभवनाने प्रसिद्धीपत्रकातून
दिली आहे.

राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा मानस आहे. तसे त्यांनी पंतप्रधानांना कळवले आहे.

जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिली.
या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले की, “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube