भाजपच्या मंत्र्यांचा प्रताप; महिलेला पाठवले नग्न फोटो, राऊतांसह वडेट्टीवारांची टीका, नक्की प्रकरण काय?

Jayakumar Gore Nude Photo Case : कालच धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली. (Photo )कृषीमंत्री माणिकराव कोकाटेही त्यांच मार्गावर आहेत. त्यातच आता भाजप मंत्री जयकुमार गोरे नवा विषय घेऊन मैदानात आलेत. त्यांच्या या विषयावरून आता मोठं वादंग उभ राहण्याची शक्यता आहे.
मंत्री गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण त्या महिलेनं स्वतः उघड केलं आहे. तर काहीही संबंध नसताना फक्त आपल्याला बदनाम करण्यासाठी गोरे त्रास देत असल्याचं त्या महिलेचं म्हणणं आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजेत त्यांचे जे रत्न आहेत ते सर्व तपासले पाहिजेत, असं म्हणत राऊतांनी जयकुमार गोरे यांच्यासह फडणवीसांनाही डिवचलं आहे.
धनंजय मुंडेंनंतर आता मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्री फडणवीस अन् अजित पवारांकडे, केली मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंडळातील पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजेत. त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व रत्न त्यांनी पुन्हा एकदा तपासली पाहिजेत. जयकुमार गोरे यांच्या बाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. गंभीर आहे आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. काल तुम्ही अबू आझमी यांच्या राजीनामाची मागणी केली, ते तुमच्या पक्षाच्या, तुमच्या मदतीला धावले होते. महाराष्ट्र कलंकित होतोय, असंही पुढे राऊत म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. ते एक विकृत मंत्री असल्याची घणाघाती टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा, मंत्री गोरे यांनी छळ आणि विनयभंग केला आहे, त्याची माहिती समोर आल्याचं राऊतांनी सांगितलं.
ती महिला येत्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा दावा राऊतांनी केला. या प्रकरणात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी याविषयी का बोलत नाही. सर्वच पक्षातील महिला पदाधिकारी, आमदार का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तर महिला आयोग कुठंय असा सवालही त्यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवारांचाही हल्लाबोल
विधानभवनाच्या परिसरात बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, एक पश्चिम महाराष्ट्रातला मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो. जेलमध्ये जाऊन येतो आणि मंत्री झाल्यावर तिच्यापाठी लागतो. पहिल्या महिला राष्ट्रपतींची जमीन लाठतो.धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आता कोकटेंचा राजीनामा बाकी आहे. अबू आझमी आणि भाजप मुख्य मुद्यापासून पळवाटा काढण्यासाठी पर्याय शोधत आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचे महिलेने म्हटलं आहे. तर आपल्याला त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असेही त्या पत्रात सांगितलं आहे. तर होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे.
अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर गोरे यांना दहा दिवसांची जेलमध्येही जाव लागलं असं या पत्रातून सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणात त्रास वाढतच गेल्याने बदनामी विरोधात ती महिला जिल्हाधिकाऱ्यांना भेटली होती. तसेच कारवाईची मागणी केली. मात्र कारवाई ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षकांकडे बोट दाखवण्यात आले होते, असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
लेखी माफी मागूनही सुरू झाला पुन्हा त्रास
दहा दिवसांची जेलवारीही करावी लागलेल्या गोरेंनी याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा दिला होता अशी माहिती आहे. मात्र, आता पुन्हा त्रास दिला जातोय अशीही तक्रार पीडित महिलेनं केली आहे. तसेच 2016 मधील दाखल केलेली तक्रार व्हॉट्सअॅप ग्रुपवर 2025 पासून व्हायरल करण्यात येत आहे. यामुळे आपले नाव आता उघड झाल्याचेही या महिलेचं म्हणणं आहे. तर आपल्यावर दबाव आणण्यासाठी दोन कोटींची खंडणी मागितल्याची खोटी तक्रार गोरे यांनी पीए अभिजित काळेमार्फत केल्याचा दावाही पीडितेने म्हटले आहे.