नाशिकमध्ये महायुतीला ग्रहण; भाजप स्वबळावर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत लढणार
महायुतीतील जागावाटपाची चर्चा अखेर फिस्कटली; शिंदेंची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा परस्पर निवडणूक रणांगणात उतरण्याचा निर्णय.
Split in the Mahayuti in Nashik! : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली महायुतीतील जागावाटपाची चर्चा अखेर फिस्कटली असून, नाशिकमध्ये महायुतीत स्पष्ट फूट पडल्याचं चित्र समोर आलं आहे. नाशिक(Nashik) महापालिका निवडणुकीत आता भारतीय जनता पक्ष(BJP) स्वबळावर निवडणूक लढवणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर युती करून निवडणूक रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकमध्ये महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू होत्या. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावर तिन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. भाजपकडून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना अपेक्षेपेक्षा कमी जागा देण्याची भूमिका घेतली जात असल्याने दोन्ही मित्रपक्षांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. परिणामी, जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनत गेला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बैठकींचे सत्र सुरू होते. मात्र अखेरपर्यंत तोडगा न निघाल्याने महायुतीत फूट पडल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता भाजपाने नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, भाजपापासून वेगळे होत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीत शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार असल्याचे चित्र आहे. प्राथमिक चर्चेनुसार, सुमारे 90 जागा शिवसेना लढवणार असून, 30 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यावर सहमती झाली आहे. मात्र अद्याप 8 ते 10 जागांवर अंतिम निर्णय बाकी असल्याने या जागावाटपात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाकडून सर्व जागा स्वबळावर लढवण्याची भूमिका अधिक प्रबळ होत असतानाच, रात्रीपर्यंत शिवसेनेसह युती टिकवण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर, युतीत जागा कमी मिळण्याची शक्यता लक्षात घेता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रात्री उशिरापर्यंत भुजबळ फार्म हाऊसवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर 59 टक्के जागा शिवसेनेला आणि 41 टक्के जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. महायुतीतील ही फूट नाशिक महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठा राजकीय वळण देणारी ठरणार असून, आता तिरंगी किंवा चौरंगी लढतींची शक्यता अधिक बळावली आहे.
