मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपची तर जिरणार नाही ना? कार्यकर्त्यांचं फडणवीसांना पत्र
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील राष्ट्रवादीत बंड केलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांचीही मोठी ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे. तसंच आगामी निवडणुकीत मोठं यश मिळेल असं नेत्यांकडून सांगितलं जातं आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील बंड आणि सरकारमधील सहभाग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. यातून त्यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला असल्याचे सांगितले जात आहे. (Bjp worker write letter to Devendra Fadavis on Ajit Pawar and Sharad Pawar)
एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्त्यांची मात्र अडचण झाली आहे. बारामतीच्या मोठ्या साहेबाची म्हणजे शरद पवार यांची जिरवता जिरवता भाजपाच्या छोट्या कार्यकर्त्यांची तर जिरणार नाही ना? असा खोचक सवाल विचारत भाजपच्या एका अडचणीतील कार्यकर्त्याने थेट फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. पुणे जिल्हा भाजप युवामोर्चा सरचिटणीस नवनाथ गंगाराम पारखी या कार्यकर्त्याने हे पत्र लिहिलं आहे. या पत्राची चांगली चर्चा होत आहे.
कार्यकर्त्याचं पत्र जसच्या तसं…
माननीय श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब,
मी गेल्या दहा वर्षापासून भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून मुळशी तालुका तसेच पुणे जिल्ह्याच्या संघटनेमध्ये सक्रिय आहे. या महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा असतील यांच्यापासून आजपर्यंत खूप सत्तानाट्य/सत्तासंघर्ष बघितले आहेत. परंतु सध्याच्या चालू घडामोडीवर आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये असुरक्षितपणाची भावना निर्माण होत आहे. मी व्यक्तिशः तुमच्या काम करण्याच्या पद्धतीचा मोठा फॅन आहे. पण कालच्या सत्यानाट्यानंतर काही प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे आपणाकडून मिळावी ही विनंती…
पत्रातील पाच प्रश्न
– अजितदादा पवार व त्यांचे सहयोगी यांना सत्तेत सामावून घेऊन राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढेल का भाजपाची?
– आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे वाली आपण आहात मग आम्हाला ताकद देणे हे आपलं काम नाही का?
– वेळ पडेल त्यावेळेस जेवणाची शिदोरी सोबत घेऊन आम्ही पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला. मग आमच्यासारख्या कार्यकर्तेच संघटनेत महत्त्व काय?
– मोठ्या साहेबाची जिरवण्याच्या नादात भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची तर जिरणार नाही ना?
– भाजपच्या मंत्रिपदाच्या शर्यतीतील सहयोगी आमदार नेत्यांचे काय ज्याने आजवर पक्षासाठी खूप काही केले?
जमलं तर जरूर उत्तर द्या साहेब..?
अजितदादांच्या बंडाने एका बाजूला महाविकास आघाडीच्या एकीला आणि ताकदीला मोठा धक्का बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदे सरकारची ताकद वाढली आहे. एकनाथ शिंदे हे गेल्या 51 वर्षांत तब्बल 200 आमदारांचा पाठिंबा मिळवणारे एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत. याशिवाय भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी असे तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास मोठा विजय मिळेल असला दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र त्याचवेळी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सोबत घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे भाजपाचीच कोंडी होते की काय, असं चित्र निर्माण झालं आहे. आता आपल्या भावना भाजप कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत.