आम्ही आपतधर्म म्हणून तुमच्यासोबत, विचार सोडू शकत नाही; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
कोरोनामुळे अडीच वर्षेच सत्तेत काम करता आले, मात्र त्या काळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजप 115 पेक्षा अधिक जागा जिंकेल.
Chandrakant Patil clarified his stand : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी विविध राजकीय, विकासात्मक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. एका संवादात बोलताना त्यांनी पुणे महापालिकेत भाजप 115 जागांखाली येणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला. गेल्या आठ वर्षांत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांव्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नसल्याकडे लक्ष वेधत, उर्वरित सर्व निवडणुका एकाच दिवशी घेण्याचा निर्णय योग्य असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सध्या राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका होत असून त्याचा व्याप मोठा आहे. निवडणुका पाच वर्षांनी होत असल्या तरी त्यासाठी सातत्याने सराव आवश्यक असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप हा ग्राउंड लेव्हलवर काम करणारा पक्ष असून ठरावीक रोडमॅपनुसारच पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील राजकीय गणितांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवार वेगळे लढले तरी त्याचा भाजपवर फारसा परिणाम होणार नाही. कोरोनामुळे अडीच वर्षेच सत्तेत काम करता आले, मात्र त्या काळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजप 115 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईच्या महापौर पदाबाबत भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकांच्या भावना आणि विकासाचे मुद्दे दोन्ही महत्त्वाचे आहेत. मुंबईकरांची भावना आहे की मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असावा. “मुंबईला खान महापौर होणार नाही, असे आम्ही म्हटले तर लोक आमच्या मागे उभे राहतील,” असे विधान त्यांनी केले. मात्र सर्व गोष्टी केवळ मतांसाठी केल्या जात नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रविंद्र चव्हाण : विकासाचे व्हिजन ते जागा वाटप
सांगलीतील सभेतील वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आठ वर्षे निवडणुका न झाल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा विचार करून युती असूनही निवडणुका वेगवेगळ्या लढवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय असून, प्रचारात एकमेकांवर टीका न करता मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणुका लढवल्या जातील, असे त्यांनी सांगितले. अजित पवारांच्या भाजपवरील टीकेनंतर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच सांगलीतील सभा घेतली होती, असे सांगत त्यांनी त्या वेळी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. “तिजोरीच्या चाव्या जरी तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे,” असे आपण म्हटल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ‘आम्ही सरकारमध्ये आहोत मात्र यांच्या विचारांसोबत नाही असं अजित पवार म्हणतात. म्हणूनच आम्ही देखील म्हणतो आपतधर्म म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही आमचे विचार सोडू शकत नाही.’
पुण्यातील विकासावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्यात दोन महानगरपालिका केल्यास विकासकामे अधिक सुलभ होतील. 2017 ते 2019 या काळात केंद्राच्या मदतीने अनेक समस्या सोडवण्यात आल्या असून सध्या पुण्यात चांगले रस्ते तयार होत आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या कामाबाबत बोलताना लोकसंख्या वाढीमुळे कामाचा वेग काहीसा मंदावल्याचे त्यांनी मान्य केले. इन्फ्रास्ट्रक्चर विकासामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विकास आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी संतुलित ठेवणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे, झाडे हलवण्याची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणीय समतोल राखता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून घोडे फक्त फरारच नाही, तर बेपत्ता करेन – वनमंत्री गणेश नाईक
गुंडांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याच्या आरोपांवर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाजपने कोणत्याही गुंडाच्या घरात उमेदवारी दिलेली नाही. संबंधित काही व्यक्तींना आपण ओळखत नसल्याचेही त्यांनी सांगितले. मोदी सरकार आल्यानंतर पासपोर्टसाठी नेत्यांच्या शिफारशींचा प्रकार बंद झाल्याचेही त्यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय, निर्वाह भत्त्याची योजना आणि उच्च शिक्षणात वाढलेला सहभाग याचा उल्लेख केला. अध्यापक भरती रखडल्यामुळे विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर बिघडले होते, मात्र आता लवकरच प्राध्यापक भरती होणार असल्याने हा प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एमपीएससीच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू असून आचारसंहिता संपल्यानंतर यावर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. पार्थ पवारांवरील आरोपांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, चौकशीअंती दोषी आढळल्यास कोणालाही माफ केले जाणार नाही. भविष्यातील योजनांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भाजप सत्तेत आल्यास इलेक्ट्रिक बसेस वाढवणे, मेट्रोचे जाळे विस्तारणे, वाहतूक, प्रदूषण आणि पाण्याच्या प्रश्नांवर विशेष लक्ष देण्यात येईल.
