छगन भुजबळ राज्यसभेवर जायला तयार, पण एका अटीवर.., भाजपकडून अद्याप ग्रीन सिग्नल नाही
भाजपने भुजबळांच्या प्रस्तावाला होकार दिल्यास ते सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा (Election) दिल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार, याचा पेच अद्याप सुटलेला नाही. या जागेसाठी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. भुजबळ यांनी काल पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडं केली असल्याची माहिती आता समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही फडणवीसांकडं तसा आग्रह केला आहे. यावर फडणवीस यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करुन यांसदर्भात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. भुजबळांच्या अटीबाबत 15 तास उलटून देखील अद्याप भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाकडं डोळे लावून बसले आहेत असं चित्र आहे. भाजपने भुजबळांच्या प्रस्तावाला होकार दिल्यास ते सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, असंही सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळांचा नाव निश्चित?, नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
नवनीत राणांचीही फिल्डिंग
आज सकाळी नवनीत राणा यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली. राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा यांचे प्रयत्न सुरू असल्याचं समजतं. गुरुवारी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. पण राष्ट्रवादीची विचारसरणीत काम करण्यावरून ताळमेळ बसणार नाही असा त्यांचा सूर होता.
आता समीकरणं बदलत असल्याने त्यांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केल्याचं समजतं. राज्यसभेच्या खासदारकीसाठी नवनीत राणा यांना राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ही जागा भाजपच्या खात्यात येण्यासाठी राणा दाम्पत्य प्रयत्न करत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 24 तासात याविषयीचं चित्र स्पष्ट होणार आहे.