छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मरक्षक? शरद पवारांनी सांगितलं
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी वावगं ठरणार नसून ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्यांनी म्हणावं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच असं विधान केलं होतं, त्यावरून राज्यात विरोधकांकडून आंदोलने सुरु आहेत. त्यानंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत धर्मवीर म्हणणं वावगं ठरणार नसल्याचं सांगितलंय.
तसेच संभाजी महाराजांविषयी आपल्या मनात जी आस्था आहे ती ठेवा, उगीच वाद घालू नका, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. ठाण्यात काही नेत्यांची नवे धर्मरक्षक अशी दिसून येतात. मात्र, ज्यांना स्वराज्यरक्षक वाटत त्यांनी म्हणावं आणि ज्यांना धर्मरक्षक वाटत त्यांनी म्हणावं असंही ते म्हणाले आहेत.
मला काळजी अशी वाटते की, मी ठाण्याला जेव्हा जातो तो धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते.
काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी बोलणं टाळलं असून यासंदर्भात अजित पवार आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच असल्याचं विधिमंडळात म्हंटलं होतं. त्यानंतर भाजपसहित काही संघटनांकडून त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, समाधीस्थळी नाक घासून माफी मागण्याची केली होती.
पवारांच्या वक्तव्याविरोधात आंदोलनकांकडून त्यांची प्रतिकात्मक पुतळे देखील जाळली जात होती. अखेर या संपूर्ण प्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.