Video : फडणवीसांकडून पुन्हा एकदा हिंदीचे जोरकसपणे समर्थन; म्हणाले, “इंग्रजीला पालख्या अन् हिंदीला..”

Devendra Fadnavis on Hindi Language : राज्यातील शाळांत इंग्रजीबरोबरच हिंदी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षांनी या नव्या शैक्षणिक धोरणावर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी हिंदी भाषेचा फुल सपोर्ट करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा हिंदीचं समर्थन करणारं वक्तव्य केलं आहे. हिंदीला विरोध करता मग इंग्रजीला का नाही. इंग्रजीसाठी पालख्या आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे अशा रोखठोक शब्दांत फडणवीस यांनी हिंदीचा सपोर्ट केला.
फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना हिंदी भाषा लादू नका असं साहित्यिकांचं म्हणणं आहे त्याबद्दल विचारलं. त्यावर फडणवीस म्हणाले, मी आधीच सांगितलं आहे की महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीचीच आहे. सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे. मराठी भाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. याचबरोबर दुसरी कोणती भाषा शिकायची असेल तरी ती शिकता येते.
महाराष्ट्र अन् मराठीला हिंदीपासून धोका नाही तर..राऊतांचा राज ठाकरेंसह मोदी, शाहंवरही वार
पण मला कधीकधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध करता मग इंग्रजीला का नाही? इंग्रजीसाठी पालख्या आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे? असा सवाल फडणवीस यांनी हिंदी भाषेला विरोध करणाऱ्यांना विचारला. यानंतर त्यांनी मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांनाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला. जर कुणी मराठी भाषेला विरोध करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला.
मराठीला गुजराती लॉबीपासून धोका : राऊत
मुंबईत मराठी पाहिजे यामध्ये कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका कुणापासून असेल तर हिंदीपासून नाही तर गुजरातीपासून आहे, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केला. लक्षात घ्या मराठी आणि महाराष्ट्राला सर्वाधिक धोका गुजराती लॉबीपासून आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हिंदी सक्तीचे शैक्षणिक धोरणापुरते मर्यादित आहे. परंतु, हा वाद महापालिका निवडणुकीसाठी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. घाटकोपरची भाषा गुजराती सांगतात तेव्हा हे का बोलत नाही? भाषेची सक्ती करायची नाही, दक्षिणेतील राज्यकर्ते कडवट आहेत. परंतु, आमचे राज्यकर्ते गुलाम आहेत अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केली.