15 August : अजितदादा पुण्यापासून दूरच! रायगडच्या गोगावले-तटकरे संघर्षावर CM शिंदेंची युक्ती

15 August : अजितदादा पुण्यापासून दूरच! रायगडच्या गोगावले-तटकरे संघर्षावर CM शिंदेंची युक्ती

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : आगामी मंत्रिमंडळ विस्तारावरुन आणि पालकमंत्रीपदावरुन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चांगलेच मान-अपमान नाट्य रंगलं आहे. अशातच येत्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणानिमित्ताने कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी मिळणार, कोणाचे पारडे जड राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यात विशेषतः नाशिक, रायगड, पुणे, जळगाव या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार यावरुन जोरदार चर्चा सुरु होत्या. (Chief Minister Eknath Shinde’s distribution of responsibility to the minister for flag hoisting on 15th August)

मात्र संभाव्य वाद आणि दावे टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आहेत. तर जेष्ठ मंत्री छगन भुजबळ हेही नाशिकचेच आहेत. मात्र या दोघांमधील संघर्ष टाळण्यासाठी दोघांनाही डावलत नाशिकमधील ध्वजारोहणाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

आता छगन भुजबळ यांना अमरावतीमध्ये तर दादा भुसे यांना धुळ्यात ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच यानिमित्ताने गिरीश महाजन यांनी जुना  हिशोब चुकता केला असल्याचेही बोलले जात आहे. नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेल्या महाजन यांच्याकडून दादा भुसे यांनी पालक मंत्रीपदाची जबाबदारी अक्षरशः खेचून घेतली होती. ती परतफेड महाजन यांनी या निमित्ताने वजन वापरुन परत केली असल्याचेही बोलले जात आहे.

नाशिकनंतर सर्वात मोठा वाद पुण्यात रंगला होता. पुण्यात यावेळी अजितदादा की चंद्रकांतदादा नेमके कोणते दादा ध्वजारोहण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अखेर पुण्यात ध्वजारोहण करण्याचा मान पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनाच देण्यात आला आहे. तर पुण्यासाठी उत्सुक असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर पालकमंत्री म्हणून स्पर्धेत असलेल्या हसन मुश्रीफ यांना सोलापूरमध्ये ध्वजारोहण करण्यास सांगण्यात आले आहे.

गोगावले-तटकरे संघर्ष टाळण्यासाठी CM शिंदेंची शक्कल :

रायगडमध्येही मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास भरत गोगावले यांनी उघडपणे तीव्र विरोध केला आहे. या संघर्षावर शक्कल लढवत रायगडमध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे ध्वजारोहणाची जबाबदारी दिली आहे. तर तटकरे यांना पालघरमध्ये ध्वजारोहण करण्यास सांगण्यात आले आहे.

जळगावमध्ये गुलाबराव पाटीलच ध्वजारोहण करणार :

जळगावमध्ये सध्या गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि अनिल पाटील असे तीन मंत्री आहेत. मात्र जळगावमध्ये गुलाबराव पाटीलच ध्वजारोहण करणार आहेत. अनिल पाटील यांच्याकडे बुलढाणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता स्वातंत्रदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी दिलेली जबाबदारी हेच पालकमंत्रीपदाचे चेहरे ठरणार की पुन्हा काही बदल होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube