Cm Eknath Shinde : ‘विघ्नसंतोषी लोकांनी मोडतोड करुन ‘तो’ व्हिडिओ व्हायरल केला’
Cm Eknath Shinde : विघ्नसंतोषी लोकांनी मोडतोड करुन तो व्हिडिओ व्हायरल केला असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदत घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या संभाषणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून…— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 13, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकार मराठा आरक्षण प्रश्नी संवदेनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण देण्याचा सरकार प्राधान्याने प्रयत्न करीत आहे. मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून याविषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, हे अतिशय निंदनीय असल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलं आहे.
Manoj Jarange : पाच अटी अन् 12 ऑक्टोबरला विराट सभा; जरांगे पाटील काय म्हणाले?
तसेच आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे.
कायदेशीरदृष्ट्या आरक्षण बसत असेल तरच द्या, अन्यथा खेळ करू नका, संभाजीराजे छत्रपतींचा इशारा
दरम्यान, सध्या राज्यात मराठा समाजाला कुणबीचे दाखल देण्यासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. जालन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचंही आमरण उपोषण सुरु आहे. याच मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. या मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात संभाषण सुरु होतं. या संभाषणादरम्यान माईक सुरु असल्याने शिंदे यांचा आवाज येत होता. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आपण बोलून मोकळं व्हायचं’ असं कथित विधान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.