Bhim Army News : चित्रा वाघ यांना धमकी, भाजप नेत्यांची जोतिबांशी तुलना अंगलट
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांच्या तोंडावर शाई फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांची क्रांतीसूर्य जोतिराव फुले (Krantisurya Jotirao Phule)यांच्याशी तुलना केली आहे. त्यावर आता विविध स्तरांतून टीका सुरु झाली आहे. भीम आर्मीनं (Bheem Army)चित्रा वाघ यांच्या तोंडावर शाई फेकण्याची धमकी दिली आहे.
पुण्यातील एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे. त्यानंतर विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या विधानावर भीम आर्मीनं आक्षेप घेतलाय. आमच्या महिला ब्रिगेड चित्रा वाघ यांचं तोंड शाईनं काळं केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराचा भीम आर्मीनं देण्यात आलाय. चित्रा वाघ तुमचं डोकं फिरलंय का? चंद्रकांत पाटलांना महात्मा जोतिबा फुले यांची उपमा देवून तुम्ही महात्मा फुलेंचा अवमान केलाय. त्यांनी महाराष्ट्राचा, देशाचा अवमान केलाय, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, तुमच्या वक्तव्याचा जाहीर तीव्र निषेध आहे. भीम आर्मीच्या महिला ब्रिगेड तुमचा शाईनं सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्रात लवकरच करतील, असा इशाराच भीमा आर्मीचे अशोक कांबळे यांनी दिलाय.
पुण्यामध्ये भाजपनं मकसंक्रांतीनिमित्त सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, पुणे हे स्त्री शक्तीचं केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झाली. आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. पण चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध सुरु आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा शुभेच्छा देते, असंही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.