काँग्रेसने कसली कंबर! लोकसभेच्या 48 मतदारसंघासाठी शिलेदार मैदानात
भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवरती चाचपणी सुरु केली आहे. काँग्रेसकडून आज (8 ऑगस्ट) 48 जागांवरती निरीक्षक आणि समन्वयकांची नेमणूक करण्यात आली. राज्यातील 23 प्रमुख नेत्यांवर 48 मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सरासरी प्रत्येक नेत्याला दोन मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Congress appointed observers and coordinators for 48 Lok Sabha seats)
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गत महिन्यात भाजपकडून लोकसभेच्या 48 जागांवर आणि विधानसभेच्या 288 जागांवर प्रभारींची घोषणा केली आहे. यातील बहुतांश प्रभारी हे त्या-त्या जागांवरील संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. त्याच धर्तीवर आता काँग्रेसने 23 नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात उतरवलं आहे.
कोणत्या नेत्याकडे कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी?
- वसंत पुरके – नंदुरबार, धुळे
- सुनील देशमुख – जळगाव, रावेर
- यशोमती ठाकूर – बुलढाणा, अकोला
- रणजित कांबळे – अमरावती
- सुनील केदार – वर्धा, यवतमाळ-वाशिम
- सतेज पाटील – रत्नागिरी – सिंधुदुर्ग, रायगड
- विजय वडे्टीवार – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया
- नितीन राऊत – गडचिरोली, चंद्रपूर
- अशोक चव्हाण – हिंगोली, परभणी
- बसवराज पाटील – नांदेड
- नसीम खान – जालना, औरंगाबाद
- बाळासाहेब थोरात – दिंडोरी, नाशिक
- विश्वजीत कदम – भिवंडी, कल्याण
- अस्लम शेख – ठाणे, पालघर
- प्रणिती शिंदे – मावळ, पुणे
- कुणाल पाटील – बारामती, शिरूर
- चंद्रकांत हांडोरे – अहमदनगर, शिर्डी
- अमित देशमुख – बीड, धाराशिव
- विलास मुत्तेवार – लातूर
- बसवराज पाटील – सोलापूर
- हुसैन दलवाई – सांगली, माढा
- भाई जगताप – सातारा
- पृथ्वीराज चव्हाण – कोल्हापूर, हातकणंगले.
पदयात्रा, राहुल गांधींची सभा अन् बस यात्रा :
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्टपासून काँग्रेस महाराष्ट्रभर पदयात्रा काढणार आहे. या पदयात्रांची जबाबदारी त्या भागातील दिग्गज नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. यात पूर्व विदर्भातून स्वतः नाना पटोले, पश्चिम विदर्भातून विजय वड्डेटीवार, मराठवाड्यातून अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण तर मुंबईतून वर्षा गायकवाड या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. इतर विभागातील पदयात्रा झाल्यानंतर सर्व नेते एकत्रित पदयात्रा काढणार आहेत. 31 ऑगस्टपूर्वी या सर्व पदयात्रा पूर्ण करणार आहेत.