बारामतीत बिनविरोधची चर्चा संपली! विजय वडेट्टीवार यांचा इशारा, राष्ट्रवादी नाही तर काँग्रेस उतरणार मैदानात

शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल, तर काँग्रेस निवडणूक लढवण्याचा विचार करेल.

  • Written By: Published:
Untitled Design 48

Congress will enter the fray, not NCP : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरून राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची राष्ट्रवादी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी जाहीर केली होती. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आय महाविकास आघाडीतील काँग्रेसने या भूमिकेला मान्यता नसल्याचे स्पष्ट करत राजकीय समीकरणात मोठा ट्विस्ट आणला आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट सांगितलं की, शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल, तर काँग्रेस त्या जागेवर निवडणूक लढवण्याचा विचार करेल. पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक यापूर्वी देखील झाली आहे आणि ही जाग महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जरी असली तरी त्या वेळी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेससोबत चर्चा झाली नव्हती, असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महसूल खात्यात इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची महसूलमंत्री बावनकुळेंची कबुली

दरम्यान या निवडणुकीत आणखी एक नवे समीकरण समोर आले आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आधी बिनविरोध होण्याची चर्चा असलेली ही निवडणूक आता तिहेरी लढतीकडे वळण्याची चिन्हे दिसत आहेत. लक्ष्मण हाके यांनी सुनेत्रा पवार यांना विधानपरिषदेतून संधी द्यावी, अशी मागणी करत विधानसभेसाठी दुसरा उमेदवार उभा करण्याचा सल्ला देखील दिला आहे. आम्ही निवडणूक लढवतो ते काहींना खटकतं, मात्र सुनेत्रा पवार यांना विधानपरिषदेवर पाठवा आणि आम्हाला ही निवडणूक लढू द्या, आम्ही जिंकून दाखवू, असही हाके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीची अधिसूचना 30 मार्च 2026 रोजी जारी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल आहे. अर्जाची छाननी 7 एप्रिलला होणार असून 9 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या दोन्ही मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. तर 6 मेपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. अशा परिस्थितीत बारामतीतील पोटनिवडणूक आता अधिकच रंगतदार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

follow us