लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादात, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार, काय आहे नक्की प्रकरण?

Lalabagcha Raja : मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव पंडालात होणाऱ्या व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी दर्शनाच्या व्यवस्थेविरोधात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील अॅड.आशीष राय आणि पंकज मिश्रा यांनी ही तक्रार आयोगासमोर दाखल केली.
या तक्रारीत त्यांचा आरोप आहे की, सार्वजनिक उत्सव असूनही दर्शनासाठी व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी अशी वेगळी रांग लावून सर्वसाधारण भक्तांच्या भावनांचा अनादर होत आहे. तसेच सर्वसामान्यांना तासन तास रांगेत उभे राहावे लागते, तर काही मोजक्यांना विशेष सवलत मिळते, हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, असे आयोगाकडे दाखल तक्रारी म्हटले आहे.
तक्रारदारांनी आयोगाकडे मागणी केली आहे की, गणेशोत्सव हा लोकउत्सव असल्याने दर्शन सर्वांसाठी समान आणि सुलभ असावे. दर्शन व्यवस्थेत भेदभाव टाळावा आणि सामान्य भाविकांना न्याय द्यावा. मानवाधिकार आयोगाने या तक्रारीची दखल घेऊन पुढील सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस पाठविण्याची शक्यता आहे.
Video : पार्थ पवार अन् जॅकलिनने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; दानपेटीत टाकण्यासाठी पैसेही दिले
ही कारवाई झाल्यास, राज्यातील इतर गणेश मंडळांच्या दर्शन व्यवस्थांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या मुंबईत एकीकडे मराठ आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे गर्दी झाली असून दसुरीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनालाही मोठी गर्दी होत आहे. अनेक मराठा बांधव आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत.
गणेशोत्सव काळात दर्शनासाठी भाविकांची विविध मंडळांत मोठी गर्दी असते. पुणे असो किंवा मुंबई भाविक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी तासन तास रांगेत उभे राहतात. त्यातच, मुंबईतील लालाबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची चढाओढ असते. अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे दर्शनासाठी भाविक येतात. मात्र, लालबागचा राजा गणेश मंडळाने व्हिआयपी आणि नॉन व्हिआयपी अशी दर्शनरांग केल्यामुळे भक्तांमध्ये भेदभाव करण्यात आल्याचं दिसून येत आहे.
व्हिआयपी रांगेतून मुंबईतील सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योगपती आणि ज्यांचा तगडा वशिला आहे, ते लालबागच्या राजाचरणी सहजपणे नतमस्तक होतात. मात्र, सर्वसामान्यांना तासन तास रांगेत उभे राहूनही नीट दर्शन घेऊ दिले जात नाही. सोशल मीडियावर या दर्शनरांगेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच, मानवाधिकार आयोग नेमकं काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.