दीपक केसरकर दरेगावात एकनाथ शिंदेंना भेटायला गेले अन् भेट न होताच परतले; नक्की काय घडलं?
Eknath Shinde : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. (Eknath Shinde) मात्र, आता गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे यांना ताप असल्याने नुकतेच त्यांना सलाईन लावण्यात आलं होतं. प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे काल घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणं पसंत केलं.
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रिपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तेच नाराज एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे. ऐन अमावस्येला एकनाथ शिंदे गावी गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावाला निघून गेले. त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. तसंच, बहुमत मिळूनही लोक राजभवनला जाण्याऐवजी अमावस्येच्या दिवशी गावाला का जातात?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगवाला आहे.
केसरकर माघारी
शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला काल त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने दीपक केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावं लागलं. त्यानंतर दीपक केसरकर मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही, त्यामुळे ते आराम करण्यासाठी आले आहेत. त्यांच्या पत्नी देखील त्यांच्यासोबत आहेत. काही लोक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना बरं नसल्याने त्यांना परत पाठवलं जात आहे, असं दरेगावमधील एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय संजय मोरे यांनी सांगितलं. जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील आणि दिपक केसरकर शिंदेना भेटण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना भेटण्यास नकार दिलाय, असंही संजय मोरे म्हणाले.