“एकनाथ शिंदे आता मोदी-शहांचे लाडके भाऊ नाही, त्यांचे डोळे..” राऊतांचा शिंदेंना खोचक टोला

“एकनाथ शिंदे आता मोदी-शहांचे लाडके भाऊ नाही, त्यांचे डोळे..” राऊतांचा शिंदेंना खोचक टोला

Sanjay Raut on Eknath Shinde : राज्यातील विधानसभेत महाविकास आघाडी पुन्हा विरोधी बाकांवर बसणार आहे. आघाडीच्या नेत्यांनी आता महायुतीवर दोन पद्धतीने हल्ला सुरू केला आहे. हा ईव्हीएमचा विजय असल्याचे सांगत ईव्हीएम विरोधात तुटून पडले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनाच टार्गेट करण्याची रणनीती दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंव घणाघाती टीका केली. एकनाथ शिंदे आता मोदी शहांचे लाडके भाऊ राहिलेले नाही. त्यांचा चेहरा मावळलाय डोळ्यांत चमकही राहिलेली नाही अशी खोचक टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

अण्णा हजारे झोपले…बाबा आढावांचे आत्मक्लेश आंदोलन, ईव्हीएम घोटाळ्याविरोधात संजय राऊत आक्रमक

राऊत पुढे म्हणाले, पहिल्याच दिवसापासून अशी माहिती समोर येत आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार परंतु सूर्य उजाडत नाही. पाच तारखेपर्यंतचा वायदा तुम्ही करत आहात तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील सांगू शकणार नाही. त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खचलेलं आहे. त्यांचा चेहरा मावळलेला आहे डोळ्यात चमक दिसत नाही. तुम्ही मोदी आणि शहांचे लाडके भाऊ राहिलेले नाहीत. शिंदेंना आता उपचारांची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना उपचार दिले पाहिजेत. भाजप हा नाग आहे आम्हाला देखील त्यांनी डंख मारला आहे. महाराष्ट्राला विषारी नागांचा विळखा पडलेला आहे. तो लोकशाही मार्गाने कसा सोडवायचा आहे आपण पाहू असे राऊत म्हणाले.

निवडणूक आयोग भ्रष्ट झालाय

महाराष्ट्राला मुख्यमंत्री नकोय की यांना प्रदीर्घकाळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहायचं आहे. आम्ही असतो तर इतक्यात त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. महाराष्ट्राचे निकाल लागून आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. निकालावर जनता खुश नाही. स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री अमावस्येच्या निमित्ताने गावाला गेले आहेत. त्या अमावस्येचं काय महत्व आहे माहिती नाही. कोण मुख्यमंत्री होणार याची वाट जनता पाहत आहे.

या राज्यांच्या निकाला संदर्भात देशभरात नाही तर जगभरात संशय व्यक्त करण्यात आला आहे. 76 लाख मतांचं नेमकं काय झालं हे मते कुठून आली? या 76 लाख मतांचा हिशोब लागत नाही. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत रांगा लावून मतदान सुरू होतं. कुठे नेमकं मतदान सुरू होतं निवडणूक आयोगाने हे दाखवावं. निवडणूक आयोग भ्रष्ट झाला आहे असा थेट आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.

दिल्लीने डोळे वटारले तर.. शिंदेकडे काही पर्याय नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर जिंकून दाखवा

जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते तेव्हा त्यांचे शंभराच्या वर आमदार होते. शिंदेंनी शिवसेना फोडली म्हणून त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं तेव्हा त्यांनी गृहमंत्री पद घ्यायला हवं होतं. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्यांच्या डोक्यात ईडी सीबीआय आहे ते कुठलाही मोठा निर्णय घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोग न्यायालय यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. मोदी-शहा यांची ताकद असेल तर त्यांनी मतपत्रिकेवर निवडणुका जिंकून दाखवाव्यात असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube