Maratha Reservation : पोलिसांच्या कारवाईवर माफी मागण्याचा पहिलाच प्रसंग; पण फडणविसांची क्षमायाचना
मुंबई : Maratha Reservation मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबींची प्रमाणपत्रे देण्यासाठी जालना जिल्ह्यातील अन्नत्याग आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचे राज्यभर प्रतिसाद उमटल्यानंतर राज्य सरकार बचावात्मक पवित्र्यात गेले आहे. पोलिसांनी केलेल्या कोणत्याही कारवाईचे समर्थन सरकार हे करत असल्याचे आतापर्यंत दिसून येते. पण पोलिसांच्या लाठीमारावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आज झालेल्या पत्रकार परिषदेत थेट क्षमा मागितली. त्याबद्दल पोलिस दलातूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
पोलिस प्रशासनाला वेळप्रसंगा नुसार निर्णय घ्यावा लागतो. या आधी अनेकदा गोळीबाराच्या, लाठीमाराच्या घटना घडल्या आहेत. त्यावर न्यायालयीन चौकशा, विभागीय चौकशा केल्या जातात. पोलिस दलाचे मनोबल खच्ची होऊ नये म्हणून कारवाईचे समर्थन करण्याची भूमिका सरकार घेते. एखाद्या-दुसऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते. पण त्या कारवाईबद्दल थेटपणे क्षमायाचना मागण्याची आतापर्यंतची पद्धत नव्हती. मात्र जालन्यातील घटनेनंतर त्याचे लोण राज्यभरात पोहोचले. त्यामुळे सरकारला नमती भूमिका घ्यावी लागली. या लाठीमाराचे आदेश हे मंत्रालयातून दिल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केल्यानंतर तर सरकारला त्यावर आणखी सारवासारव करावी लागली.
Jalna Maratha Protest : मनोज जरागेंनी सोप्या शब्दात दूर केला राज ठाकरेंचा संभ्रम
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना जनलर डायरची उपमा दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही लाठीमार करायचा असेल तर गृहमंत्र्यांची परवानगी लागत असल्याची पद्धत सांगत फडणविसांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीची बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी या मुद्यावर सविस्तरपणे स्पष्टीकरण दिले.
ते म्हणा्ले की जालना येथील घटना दुर्दैवी आहे. पोलिसांच्या बळाच्या वापराचे समर्थन जाऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना दोन हजार आंदोलने झाली. पण बळाचा वापर झाला नाही. जालना येथील झालेल्या लाठीमाराबद्दल शासनाच्या वतीने मी क्षमा मागतो. लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातूम आल्याचे नरेटिव्ह जाणीवपूर्वक सेट केला जात आहे. अशा कारवाईंचे आदेश हे पोलिस अधीक्षक आणि पोलिस आयुक्त यांच्या पातळीवरच घेतले जातात. असे असते तर मावळ येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराचा आदेश तेव्हा सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी दिले होते का, नागपूरमध्ये गोवारी आंदोलच्या वेळी आदेश कोणी दिले, असा सवाल विचारायचा का, असे प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केले.
सरकारने जालना येथील पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली करून तेथे शैलेश बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. तसेच लाठीमाराच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलिस महासंचालकांमार्फत यांची समिती नेमली आहे. मात्र त्या आधीच गृहमंत्र्यांनी थेट क्षमा मागितल्याने पोलिस दलात आश्चर्य व्यक्त होत आहे.