वाघाचे दात काढले? देवेंद्र फडणवीसांच्या कारभाराला दिल्लीतून चाप

वाघाचे दात काढले? देवेंद्र फडणवीसांच्या कारभाराला दिल्लीतून चाप

देवेंद्र फडणवीस. मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्रात भाजपचे (BJP) एकहाती नेतृत्व करणारा खमका चेहरा. आधी प्रदेशाध्यक्ष, मग मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री. कधी कोणाला ताकद द्यायची, कधी कोणाचे पंख छाटायचे, कधी कोणाला सोबत घ्यायचे, कोणाला कोणता शब्द द्यायचा, काय रणनीती आखायची असे निर्णय फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतले. अगदी एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर त्यांनाच मुख्यमंत्री करायचे हा निर्णय देखील फडणवीस यांनी धाडसाने घेतला. अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेण्याचा डाव त्यांनी खेळला. अर्थात या सगळ्यासाठी त्यांना दिल्लीचाही आशीर्वाद होताच. त्यामुळेच हे निर्णय अंमलात येऊ शकला. थोडक्यात प्रदेशाध्यक्षपदी कोणीही असले तरी फडणवीस यांना विचारल्याशिवाय किंवा ते म्हणतील तेच निर्णय महाराष्ट्रात घेतले गेले हे सत्य आहे.

पण नुकत्याच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर फडणवीस यांचे हे सारे स्वातंत्र्य संपुष्टात आले आहे. दिल्लीत पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत केंद्रातील नेत्यांनी फडणवीस यांना कानपिचक्या दिल्या आहेत. महायुतीच्या नेत्यांबरोबरच पक्षातील नेत्यांशीही संवाद ठेवा; सारे काही मीच करणार, अशी भूमिका न घेता पक्षाच्या नेत्यांमध्ये जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा, अशा शब्दात त्यांची कानउघडणी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे फडणवीस हे आता दात काढलेले वाघ झाले आहेत का? असा सवाल विचारला जातोय. नेमके आणखी काय काय सांगितले आहे फडणवीस यांना आणि या बैठकीत काय घडामोडी घडल्या तेच आपण पाहू… (Devendra Fadnavis’ dominance in Maharashtra has come to an end after his defeat in the Lok Sabha elections.)

सुजय विखेंना पराभव अमान्य : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लाखो रुपये भरुन करणार चौकशी

दिल्लीत राज्य सुकाणू समितीची बैठक पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत लोकसभेतील पराभवाची झाडाझडती घेतली गेली. शिवाय काही नेत्यांना कानपिचक्याही देण्यात आल्या. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत चार ते पाच प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. भाजपने लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे, या एकाच राजकीय कथनाने (नॅरेटिव्ह) पुढे नेण्याचे ठरवले होते. पण महाराष्ट्रामध्ये हे नॅरेटिव्ह समाजमाध्यमे असतील किंवा इतर माध्यमे असतील यांमध्ये दिसून आले नाही. विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हला उघडे पाडण्यात राज्य नेतृत्व का अपयशी ठरले? शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात अपयश का आले? दिंडोरीतील पंतप्रधानांच्या भरसभेत संतप्त तरुण कसा पुढे आला? मराठवाड्यात भाजपला इतका फटका बसण्याचे ठळक कारण मराठा आरक्षण आंदोलन हे असेल तर ते वेळेवर नीट का हाताळले गेले नाही? या सगळ्या गोष्टींबाबत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी जो कौल दिला तो भूतकाळ झाला. आता आगामी विधानसभा जिंकण्याचेच आपले लक्ष्य आहे. ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढवल्या जातील, हेही पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले. त्याचवेळी तुम्हाला केंद्राकडून संपूर्ण पाठबळ आहे म्हणून, एकला चलो रे, अशी भूमिका घेऊ नका, असा इशाराही फडणवीस यांना दिल्याचे सांगण्यात येते. फडणवीस यांच्याबद्दल राज्य भाजपमधील एक गट मागील अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे दिसून येते. यात पहिला नंबर लागतो तो पंकजा मुंडे यांचा. त्यापाठोपाठ एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची नावेही प्रामुख्याने सांगण्यात येतात. शिवाय जिल्ह्यातील नेत्यांनाही काम करण्याचे स्वातंत्र्य नाही, जे वरुन येईल तेच खाली राबवायचा अशीही तक्रार वारंवार केली जात होती. त्यावरही पक्षनेत्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या वाटून द्या आणि त्यांना स्वतंत्रपणे काम करू द्या, तुम्ही त्यांच्या कामात अकारण हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असेही केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याचे समजते.

चार दिवसांपासून चूल बंद, लेकरू उपाशी असताना घास कसा गोड लागेल? हाकेंच्या आईला अश्रू अनावर…

विनोद तावडेंच्या महाराष्ट्रात परतण्याच्या चर्चांनाही या बैठकीत ब्रेक लागला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस यांच्या जागी विनोद तावडे येऊ शकतात, अशी चर्चा होती. पण ही निवडणूक फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढविल्या जाणार आहेत. सोबतच या बैठकीत विनोद तावडे यांना त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या बिहार राज्याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तावडे तुर्तास तरी राष्ट्रीय राजकारणातच रमणार असल्याचे दिसून येते.या बैठकीत आणखी एका मुद्द्यावर चर्चा झाली तो म्हणजे जागा वाटप. लोकसभा निवडणुकीत जागा वाटप अखेरच्या दिवसांपर्यंत ताणले गेले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीच्या उमेदवारांना प्रचारासाठी अपुरा वेळ मिळाला. त्याची पुनरावृत्ती विधानसभेला टाळण्यासाठी जागा वाटप लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना अमित शाह यांनी दिल्या आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीतील पराभवने शिकून महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केलीय हे निश्चित

follow us
  • fb
  • instagram
  • youtube