महापालिका कर्मचारी धीरज परदेशीचा उपचारादरम्यान मृत्यू, पोलिसांकडून काही संशयित आरोपींना अटक

महापालिकेच्या कंत्राटदार संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (15)

Dheeraj Pardeshi dies during treatment : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात सार्वजनिक काम करत असताना महापालिकेच्या कंत्राटदार संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलली असून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धीरजसिंग परदेशी हे मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी काही व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार जुन्या वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र घटनेमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम उघड करण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात आहे.

या घटनेनंतर अहिल्यानगर महापालिकेने निषेध म्हणून आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत शहरातील काही सार्वजनिक सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनातही चिंतेचे वातावरण आहे.

145 प्रवासी घेऊन जाणाऱ्या Air India फ्लाइटचा पायलट नशेत? टर्ब्युलन्समुळे 17 जण रुग्णालयात दाखल

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार संग्राम जगताप यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सार्वजनिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करून दोषींना तातडीने अटक करावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. काही विशिष्ट प्रवृत्तींबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याची आवश्यकता असल्याचेही नमूद केले.

दुसरीकडे, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस यंत्रणा निष्पक्ष आणि सखोल तपास करत असून नागरिकांनी तपास प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणातील सर्व संबंधित बाबींची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, धीरजसिंग परदेशी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

follow us