Kurla bus accident: कुर्ला बस अपघाताचं कारण काय? चालकाची काय चूक झाली; खरं कारण समोर
Kurla Bus Accident In Mumbai : मुंबईतील कुर्ला बेस्ट बस अपघाताने महाराष्ट्र हादरला. (Kurla Bus) रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातात भरधाव बसने अनेकांना चिरडलं. या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांद्वारे संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी बसचा चालक संजय मोरे यास बोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, याच अपघाताचं संभाव्य कारण समोर आलं आहे.
अपघाताचं नेमकं कारण काय?
या दुर्घटनेनंतर आमदार दिलीप लांडे यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनीच हा अपघात नेमका का झाला, याबाबत माहिती दिली आहे. ‘कुर्ला स्टेशनहून एक बस निघाली होती. ही बस प्रवाशांनी भरलेली होती. त्या बसचे ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे चालक घाबरला. तो घाबरल्यामुळे त्याने ब्रेकवर पाय देण्याऐवजी एक्सलेटरवर पाय दिला. त्यामुळेच बस जास्त वेगात धावली.
कुर्ला स्टेशन ते आंबेडकर चौकापर्यंत बस सर्वांना चिरडत आली. यात 26 जण जखमी आहेत. बाबा रुग्णालयात सर्वांवर उपचार करण्याची सोय नसल्यामुळे उर्वरित रुग्णांना सिटी हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, राजेवाडी हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे,’ अशी माहिती दिलीप लांडे यांनी दिली आहे. दरम्यान, मृतांचा आकडा 5 वर गेला आहे. तर जखमी 26 जण आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावं
विजय विष्णू गायकवाड(७०)
आफ्रीन अब्दुल सलीम शहा(१९)
अनम शेख(२०)
कणीस फातिमा गुलाम कादरी(५५)
शिवम कश्यप(१८)
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी बस चालक संजय मोरे (54) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाई कुर्ला पोलीस करत आहेत.