विधान परिषद निवडणूक : महायुतीला महिन्याच्या आत दुसरा दणका? मविआचे तगडे प्लॅनिंग

विधान परिषद निवडणूक : महायुतीला महिन्याच्या आत दुसरा दणका? मविआचे तगडे प्लॅनिंग

मुंबई : लोकसभा निवडणुकीत 31 जागा जिंकल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यानंतर अवघ्या महिन्याभरात महायुतीला दुसरा दणका देण्याची तयारी आघाडीच्या नेत्यांनी सुरु केल्याचे दिसून येते आहे. विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे आठ आणि महाविकास आघाडीच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. पण आघाडीने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील नाराज आमदारांना हेरुन आपली चौथी जागाही निवडून आणण्याचे नियोजन केल्याचे बोलले जाते. त्याचवेळी भाजपला आपल्या पाचव्या आणि महायुतीला नवव्या जागेसाठी पहिल्या पसंतीची पाच मते कमी पडतात. ही मते आणण्यासाठी महायुतीचीही नजर आघाडीतीलच नाराज आमदारांवर असणार आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक पुन्हा एकदा उत्कंठा वाढवणारी ठरणार असल्याचं दिसून येते… (Elections have been announced for 11 Legislative Council seats)

पाहुया नेमकी काय आहेत गणिते…

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. यासाठी 25 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. गरज पडल्यास 12 जुलै रोजी मतदान आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार अकरापैकी महायुतीच्या आठ आणि महाविकास आघाडीच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. पण सहज होईल ती महाराष्ट्रातील निवडणूक कशी. महायुतीने नववी जागा जिंकण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. तर महाविकास आघाडीने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटातील नाराज आमदारांना हेरुन आपली चौथी जागाही निवडून आणण्याचे नियोजन केले आहे.

आता हे नियोजन कितपत यशस्वी होऊ शकते हे बघण्यापूर्वी आपल्याला विधानसभेतील सध्याचे संख्याबळ बघावे लागेल…

विधानसभेतील 288 पैकी 14 जागा सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे रिक्त आहेत. उर्वरित 274 मध्ये महायुतीचे 202 आमदार आहेत. यात भाजपचे 103, राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 आणि शिवसेनेचे 38 आमदार आहेत. शिवाय इतर छोटे पक्ष आणि अपक्ष असे 22 आमदारही महायुतीसोबत आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे 37, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 15, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 13 आणि इतर सात असे 72 आमदार आहेत.

एक आमदार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 23 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार, स्वबळावर भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. तर मित्रपक्षांच्या मदतीने शिवसेनेच्या दोन आणि आणि राष्ट्रवादीच्या दोन अशा आठ जागा निवडून येऊ शकतात. इथे भाजपला त्यांच्या पाचव्या आणि महायुतीला नवव्या जागेसाठी पहिल्या पसंतीची पाच मते कमी पडतात. त्याचवेळी काँग्रेसची एक, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या पक्षाची एक जागा निवडून येऊ शकते. तर काँग्रेसकडील 14, ठाकरे-पवारांकडील पाच आणि इतर सात अतिरिक्त मतांच्या आधारे तिसरी जागा निवडून येऊ शकते.

दिल्लीश्वरांनी फडणवीसांसह भाजप नेत्यांना झापलं; हाय व्होल्टेज बैठकीतील ‘अंदर की बात’ बाहेर

पण महायुतीतील नाराजांच्या आधारे महाविकास आघाडीने आपली चौथी जागाही निवडून आणण्याचे नियोजन केल्याचे बोलले जाते. महायुतीमध्ये काही दिवसांपासून अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जाते. अशात या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आमदारांच्या नाराजीला हवा दिली. भाजपसह, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला आलेले अपयश हे आमदारांना विचार करण्यास भाग पाडत आहे. देशाचे जनमत भाजपच्या बाजूने असले तरीही महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. पुन्हा निवडून यायचे असल्यास या आमदारांना निधीसोबत जनमताची मान्यता असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे चित्र बघितल्यास महाविकास आघाडीला तब्बल 164 मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. तर महायुतीला केवळ 128 मतदारसंघांमध्ये यश मिळाले होते. यातही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आमदारांच्या मतदारसंघात महायुतीला कमालीचा फटका बसला. अजितदादांच्या तर 39 पैकी तब्बल 30 आमदारांच्या मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. याशिवाय लोकसभा आणि राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या मनात डावलल्याची भावना तयार झाली आहे.

Video : पहिले मोदींचे पाय अन् आता थेट हात; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना झालंय तरी काय?

हीच सगळी समीकरणे पाहुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे आणि अजितदादांच्या गटातील नाराज आमदारांना शोधण्यास सुरुवात केली आहे. पण त्याचवेळी भाजपनेही महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना गळ टाकला आहे. दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नाराज आमदारांच्या मदतीने यश मिळविले होते. त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा यंदाही प्रयत्न असणार आहे. त्यामुळे 12 वा उमेदवार रिंगणात उतरल्यास यंदाची विधान परिषद निवडणूक देखील नाट्यमय ठरणार हे नक्की आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube