पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, मिसिंग लिंक तासभर बंद
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांचा ढिगारा साचल्याने मुंबईकडे जाणारा ‘मिसिंग लिंक’ मार्ग सुमारे एक तास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवावा लागला.
Fatal accident on Pune-Mumbai expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. खालापूर फूड मॉलजवळ पहाटे पाचच्या सुमारास दोन अवजड वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातानंतर काही क्षणांतच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका इर्टीगा कारने अपघातग्रस्त वाहनाला जोरदार धडक दिली. या दुहेरी अपघातात कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलीस, बचाव पथक आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
IPL फायनलमधील पराभवानंतर गुजरात टायटन्सला धक्का; हॉटेलकडे जाताना संघाच्या बसला आग, सर्व खेळाडू सुरक्षित
दरम्यान, अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांचा ढिगारा साचल्याने मुंबईकडे जाणारा ‘मिसिंग लिंक’ मार्ग सुमारे एक तास वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवावा लागला. यामुळे हायवे पोलिसांनी वाहतूक लोणावळ्यापासून मुख्य द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली. अचानक करण्यात आलेल्या या वाहतूक बदलामुळे आणि वाहनांची संख्या अधिक असल्याने महामार्गावर जवळपास दोन तास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा फटका बसला.
यानंतर प्रशासनाने क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त अवजड वाहने आणि कार बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. रस्त्यावरील अडथळे दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आणि मिसिंग लिंक मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुदैवाने या अपघाताचा मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्या दिशेची वाहतूक नियमितपणे सुरू होती. या भीषण अपघाताचे नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.