IPL फायनलमधील पराभवानंतर गुजरात टायटन्सला धक्का; हॉटेलकडे जाताना संघाच्या बसला आग, सर्व खेळाडू सुरक्षित
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फायनलमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर संघ हॉटेलकडे परतत असताना त्यांच्या बसला अचानक आग लागली.
Gujarat Titans bus catches fire : आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यातील पराभवाची निराशा अजूनही कायम असतानाच गुजरात टायटन्सच्या संघावर आणखी एक संकट कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फायनलमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर संघ हॉटेलकडे परतत असताना त्यांच्या बसला अचानक आग लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर पडताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यानंतर गुजरात टायटन्सचा संघ हॉटेलकडे रवाना झाला होता. मात्र, प्रवासादरम्यान बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही क्षणांतच बसमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने परिस्थिती गंभीर बनली. चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने बस थांबवली आणि सर्व खेळाडूंना व सपोर्ट स्टाफला त्वरित खाली उतरवण्यात आले.
पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! फडणवीसांचे ‘संकटमोचक’ संजय काकडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
बसमधून बाहेर पडताच काही खेळाडू रस्त्याच्या कडेला उभे राहिले, तर काही जण अधिक सुरक्षित ठिकाणी गेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्वांना वेळेत बसमधून बाहेर काढण्यात आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आग लागल्यानंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना आणि स्टाफ सदस्यांना जवळपास एक तास रस्त्यावरच थांबावे लागले. त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि संघ व्यवस्थापनाने पर्यायी वाहनांची व्यवस्था केली. सर्व सदस्यांना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले असून कोणालाही दुखापत झालेली नाही.
गुजरात टायटन्ससाठी ही रात्र दुहेरी धक्का देणारी ठरली. एका बाजूला आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले, तर दुसऱ्या बाजूला संघाच्या बसला आग लागल्याने चिंता वाढली. याआधीच सततच्या प्रवासामुळे आणि व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंवर ताण होता. धर्मशाला, मुल्लांपूर आणि अहमदाबाद असा सलग दौरा, त्यात हवामानामुळे झालेला विलंब, यामुळे संघ थकलेला असल्याची चर्चा होती. दरम्यान, बसला आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट हे प्राथमिक कारण असल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला असून सविस्तर चौकशी केली जाणार आहे. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि गुजरात टायटन्सचे सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ सुरक्षित आहेत.