पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! फडणवीसांचे ‘संकटमोचक’ संजय काकडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
संजय काकडे हे पुण्याच्या राजकारणातील 'किंगमेकर' आणि जोडतोडीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहेत.
BJP Sanjay Kakade Join NCP : पुण्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि संकटमोचक संजय काकडे यांनी त्यांचे चिरंजीव विक्रम यांच्यासह राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पुण्यातील जिजाई निवासस्थानी खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. काकडे यांच्या या ‘सीमोल्लंघनामुळे’ पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी “माझ्या स्वतःच्या पक्षातील लोकांचा जर माझ्यावर विश्वास नसेल, तर माझे त्यांच्याशी काही देणेघेणे नाही,” असे म्हणत भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवले होते.
प्रवेशामागचा ‘राजकीय अँगल’ आणि मोठी गणिते
संजय काकडे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. संजय काकडे हे पुण्याच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ आणि जोडतोडीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहेत. 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे 90 हून अधिक नगरसेवक निवडून आणण्यात काकडेंच्या मॅनेजमेंटचा मोठा वाटा होता. आता काकडे राष्ट्रवादीत गेल्यामुळे पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपला त्यांच्याच रणनीतीचा फटका बसू शकतो.
देवेंद्र फडणवीसांसाठी वैयक्तिक धक्का
संजय काकडे हे थेट देवेंद्र फडणवीस यांचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जात होते. भाजपमध्ये अंतर्गत वाद मिटवणे असो किंवा इतर पक्षांतील बडे नेते भाजपमध्ये आणणे, ही कामे फडणवीस काकडेंवर सोपवायचे. अशा अत्यंत खास्या माणसाने साथ सोडणे हा फडणवीसांसाठी पुण्यात मोठा राजकीय फटका मानला जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ‘मराठा’ समीकरणांवर परिणाम
संजय काकडे हे मराठा समाजातील एक बडा आणि उद्योजक चेहरा आहेत. सध्या राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या आणि राजकीय वातावरणात, काकडेंसारखा नेता राष्ट्रावादीत गेल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा मतदार आणि समीकरणांवर परिणाम होईल असे बोलले जात आहे.
पुण्याच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ अन् पडद्यामागील रणनीतीकार
संजय दत्तत्रय काकडे (Sanjay Kakade) हे महाराष्ट्राच्या, विशेषतः पुण्याच्या राजकारणातील एक अतिशय वजनदार आणि ‘हाय-प्रोफाईल’ नाव आहे. एक यशस्वी रिअल इस्टेट व्यावसायिक ते दिल्लीच्या संसदेपर्यंत आणि पुण्याच्या गल्लीपासून ते भाजपच्या सर्वोच्च वर्तुळापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक राहिला आहे.
अपक्ष म्हणून राजकीय एन्ट्री अन् राज्यसभा (2014 – 2020)
संजय काकडे यांनी 2014 मध्ये थेट दिल्लीच्या राजकारणातून आपल्या सक्रिय राजकीय प्रवासाची सुरुवात केली. कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा नसताना त्यांनी 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणूक लढवली. आपल्या तगड्या जनसंपर्काचा आणि चाणाक्ष रणनीतीचा वापर करत त्यांनी ही निवडणूक जिंकली आणि 3 एप्रिल 2014 रोजी ते राज्यसभेचे खासदार बनले. एप्रिल 2020 पर्यंत त्यांनी खासदार म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केला.
भाजपशी जवळीक आणि ‘सहयोगी खासदार’
राज्यसभेत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. भाजपचे ‘सहयोगी खासदार’ म्हणून काम करताना ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळ आले. फडणवीसांचे ‘संकटमोचक’ आणि पडद्यामागील रणनीतीकार म्हणून भाजपमध्ये त्यांचे वजन झपाट्याने वाढले.
2017 चा ‘पुणे महापालिका पॅटर्न’ आणि किंगमेकरची भूमिका
संजय काकडे यांच्या कारकीर्दीचा सुवर्णकाळ 2017 च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळाला.पुण्यात अनेक दशकांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. तो ढासळत 2017 मध्ये भाजपला तब्बल 92 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात काकडेंच्या ‘इलेक्शन मॅनेजमेंट’चा सिंहाचा वाटा होता. याशिवाय इतर पक्षांमधील नाराज आणि बड्या नेत्यांना भाजपमध्ये आणून तिकीट देणे आणि त्यांना निवडून आणणे, यामध्ये काकडेंनी मास्टरमाइंड म्हणून काम केले. त्यामुळे याच काळात त्यांना पुण्याच्या राजकारणाचे ‘किंगमेकर’ म्हटले जाऊ लागले. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेऊन भाजपने त्यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. पक्षाचे आर्थिक नियोजन, निवडणुकांमधील अंतर्गत बंडाळ्या शमवणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करणे यात त्यांनी पडद्यामागून मोठी भूमिका बजावली.
अंतर्गत नाराजी आणि पक्षांतराच्या चर्चा
2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर पुणे भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे संजय काकडे काहीसे बाजूला पडले. पक्षातील स्थानिक नेतृत्वाने आपल्याला बाजूला सारल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली. 2019 मध्येच त्यांनी एकदा अजित पवारांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच ते पक्षांतर करणार अशा चर्चा रंगत होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करत त्यांची नाराजी दूर केली होती.