रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला एफडीएचा दणका! संचालकासह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

FDA on Reliance Blinkit and Zomato च्या संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

FDA Reliance Blinkit And Zomato

FDA cracks down on Reliance, Blinkit, and Zomato Cases registered against directors, officials, and employees : राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदी धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हा पासून त्यांनी अवैध, भेसळ तसेच अस्वच्छता असणाऱ्या अस्थापनांवर थेट परवाना निलंबनाची कारवाई केली. त्यातच आता एफडीने थेट रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या एका संचालकासह रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; दोन नेत्यांची उमेदवारी बाद, रुपाली राजपुरेंना दिलासा

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थ यांची अफरातफर करून विक्री केली जात असल्याच्या संशयावरून विविध जिल्ह्यांत छापेमारी केली. या कारवाईत सुमारे ४८ लाख रुपये किमतीचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या एका संचालकासह अन्य नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस बरसण्याचा अंदाज

ठाण्यातील शांतिनगर पोलीस ठाण्यात ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. यामध्ये एकूण १० जणांची नावे आहेत. त्यात रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअरशी संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मालाची विल्हेवाट लावणारी एजन्सी चालवणारे आणि स्थानिक पुरवठादार यांचा समावेश आहे.

मुलांना इंटरनेट वापरण्यापासून रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

हा गुन्हा अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांनुसार दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक व्ही. सुब्रमण्यम, याच कंपनीतील अशोक कुमार सिंह, रिलायन्स रिटेल लिमिटेडचे नामनिर्देशित प्रतिनिधी विजय भिकाजी खर्माले आणि कंपनीचे वेअरहाऊस मॅनेजर नीलेश रामदासराव देशमुख यांची नावे आहेत.

ब्लिंकिट आणि झोमॅटोविरोधातही गुन्हा

या प्रकरणात ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक अरविंदर सिंह ढीन्सा आणि दीपक सिंह यांचाही समावेश आहे. याशिवाय झोमॅटो हायपरप्युअर प्रायव्हेट लिमिटेडचे आबिद शेख, ‘एम/एस बी. के. डिस्पोज’चे बाबर मियाँ अहमद सिद्दीकी, भिवंडीतील पुरवठादार गुलजार अब्दुल खान, भिवंडीतील चविंद्र आणि तेथील ‘डिस्काउंट स्टोअर’चे अब्दुल मोबिन खान यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ठाणे आणि पुणे जिल्ह्यांत छापेमारी

FDA ने दिलेल्या माहितीनुसार, 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी ठाणे आणि पुणे जिल्ह्यांतील विविध ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान भिवंडीतील मालाची विल्हेवाट लावण्याच्या ठिकाणाहून 24 लाख रुपयांहून अधिक किमतीचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. वडपे येथील रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या गोदामातून सुमारे 4.92 लाख रुपयांचा साठा, तर उसताणे येथील झोमॅटो हायपरप्युअरच्या केंद्रातून सुमारे 7.81 लाख रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला. जप्त केलेल्या एकूण खाद्यपदार्थांची किंमत 48 लाख 9 हजार 924 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुदत संपलेले पदार्थ पुन्हा विक्रीसाठी पाठवल्याचा संशय

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, FDA च्या प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. मुदत संपलेले, खराब झालेले तसेच ग्राहकांनी परत केलेले खाद्यपदार्थ नष्ट करणे अपेक्षित होते. मात्र, हे पदार्थ विल्हेवाट लावणाऱ्या एजन्सी, विनापरवाना वर्गीकरण केंद्रे आणि मध्यस्थांच्या माध्यमातून पुन्हा किरकोळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचा संशय आहे. त्यानंतर हे पदार्थ ग्राहकांना विकले जाण्याची शक्यता तपासली जात आहे. आरोपानुसार, संबंधित एजन्सींनी खाद्यपदार्थ प्रत्यक्षात नष्ट करण्यात आले आहेत की नाही, याची योग्य पडताळणी न करताच ते नष्ट केल्याचे प्रमाणपत्र आणि कागदपत्रे जारी केली. FDA अधिकाऱ्यांना विल्हेवाटीच्या नोंदींमध्येही अनियमितता आढळली. यामध्ये खाद्यपदार्थांच्या प्रमाणातील तफावत तसेच माल पाठवणारे आणि स्वीकारणारे यांच्याशी संबंधित तपशीलांमध्ये विसंगती असल्याचे समोर आले.

विनापरवाना दुकानात मुदत संपलेले पदार्थ

सूत्रांच्या माहितीनुसार, भिवंडीतील विनापरवाना यार्डमध्ये या खाद्यपदार्थांचे वर्गीकरण केले जात होते. त्यातून बाहेरून व्यवस्थित दिसणारी पाकिटे वेगळी काढून ती मध्यस्थ आणि पुरवठादारांना विकली जात असल्याचा आरोप आहे. यानंतर भिवंडीतील गुलजार नगर परिसरातील एका किरकोळ विक्री केंद्रावर मुदत संपलेले आणि गळती होत असलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. हे दुकान कोणत्याही परवान्याशिवाय सुरू होते. तसेच, तेथील खाद्यपदार्थांच्या खरेदीची बिलेही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

पुण्यात सात पथकांकडून तपासणी

ठाणे आणि पुणे जिल्ह्यांत संयुक्त तपासणी करण्यासाठी FDA ने सात पथके तयार केली होती. या पथकांमध्ये सहायक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश होता. कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी खाद्यपदार्थांच्या साठ्याची यादी तयार करून तो जप्त केला. तसेच, नमुने गोळा केले, संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले आणि जप्त केलेला माल अन्यत्र हलवणे, त्याची विक्री करणे किंवा तो नष्ट करणे यावर बंदी घालणारे निर्देश दिले. 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर विनापरवाना सुरू असलेल्या चार ठिकाणांवरील व्यावसायिक व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

follow us