एफडीएचा छत्रपती संभाजीनगरमध्ये धाडीचा धमाका; अमोल दूध डेअरीवर धडक कारवाई
चिकलठाणा एमआयडीसीतील सर्व्हिस इंडस्ट्री प्लॉट क्रमांक सी-45 येथील मेसर्स अमोल दूध डेअरी मालक दामोदर केदार येथे करण्यात आली.
सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेसर्स अमोल दूध डेअरीवर धडक कारवाई करत बनावट दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचा प्रकार उघडकीस आणला. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात गैर-खाद्य (नॉन-फूड ग्रेड) सोयाबीन तेलाचा वापर करून बनावट गाईचे तूप, क्रीम आणि ॲनालॉग पनीर तयार केले जात असल्याचे आढळले.
एफडीएच्या पथकाने डेअरीतून सुमारे 10 ते 12 बॅरल्स नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेल जप्त केले. तसेच एकूण 950 किलो वजनाचा आणि 3 लाख 12 हजार 380 रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला. यामध्ये 299 किलो सुट्टे तूप, 199 किलो साय (क्रीम), 174 किलो पनीर (35 ब्लॉक्स) आणि 278 किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे.
ही कारवाई चिकलठाणा एमआयडीसीतील सर्व्हिस इंडस्ट्री प्लॉट क्रमांक सी-45 येथील मेसर्स अमोल दूध डेअरी मालक दामोदर केदार येथे करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.