Lok Sabha Election : भाजपची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला का वगळले?
मुंबई : जगातील सर्वात मोठा पक्ष अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढविणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) गांधीनगरमधून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय अन्य 31 केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आज भाजपच्या मुख्य कार्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी या नावाची घोषणा केली. 195 उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशमधील 51, पश्चिम बंगाल 20, मध्य प्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरल 12, तेलंगणा – 9, आसाम – 11, झारखंड – 11, छत्तीसगड – 11 दिल्ली – 5, जम्मू कश्मीर – 2, उत्तरराखंड 3, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1, त्रिपुरा 1 आणि अंदमान निकोबार 1 अशा विविध राज्यांमधील नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये 28 महिला आणि 47 युवा नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (first list of 195 candidates of the Bharatiya Janata Party for the Lok Sabha elections has been announced but not a single candidate from Maharashtra has been announced.)
महाराष्ट्रातील एकाही नावाची घोषणा नाही :
मात्र पहिल्या यादीतून महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवारीची घोषणा झालेली नाही. अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पहिल्या यादीत उमेदवाराची देण्यात आलेली नाही. कदाचित दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र आणि उर्वरित राज्यांतील नावांची घोषणा होऊ शकते. मात्र महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य वगळल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामागे भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या जागा वाटपाचे भिजत पडलेले घोंगडे, या जागा वाटपात होणारे वाद, संभाव्य बंडखोरी, काँग्रेसमधील बड्या नेत्यांचे रखडलेले पक्षप्रवेश अशी अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपने आज ज्या उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम, गोवा या राज्यांमधील उमेदवारांची घोषणा केली तिथे भाजप पूर्ण बहुमतात सत्तेत आहे, झारखंड, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. यामुळे भाजपने या राज्यांमधील उमेदवारांची घोषणा केल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात मात्र भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जागा वाटप करताना या तिन्ही पक्षांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
महायुतीमध्ये वाद?
यात सर्वात मोठा वाद आहे तो म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या. शिवसेनेने सध्याच्या सर्व 18 जागांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीने शिंदेंएवढ्याच जागा आपल्यालाही मिळाव्या अशी मागणी केली आहे. मात्र भाजपने महायुतीमध्ये 32-12-4 असा फॉर्म्युला ठरविला असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. थोडक्यात महायुतीत जे खासदार आहेत त्यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीने गत निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा आता असलेल्या बहुतांश जागांवर भाजपचा डोळा चर्चा आहे. त्यासाठी महायुतीत वाटाघाटी चालू असल्याचे आणि त्यातूनच वाद सुरु असल्याचे बोलले जाते.
दबक्या आवाजात शिवसेनेच्या अनेक खासदारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. तो निर्णयही अद्याप होऊ शकलेला नाही. काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. अशावेळी ती जागा महायुतीत कोणाला जाणार? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय राज्यात बहुतांश विद्यमान खासदार यांचे तिकीट कापले जाण्याची चिन्ह आहेत. यात हे खासदार महाआघाडीच्या गोटात जाणार नाही ना? ऐनवेळी बंडखोरी तर होणार नाही ना? याचीही काळजीही भाजपला घ्यायची आहे. त्यामुळेच तिन्ही पक्षातील याद्या एकाच वेळी जाहीर करायच्या का? ही शक्यता व्यक्त केली जाते आहे.
अनेक ठिकाणी भाजपचे दिग्गज नेते आहेत, मात्र ती जागा शिवसेनेकडे आहे. उदाहरणार्थ रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना तिकीट देण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. पण तो मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. उस्मनाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून आलेले बसवराज पाटील भाजपच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहेत. मात्र ती जागाही शिवसेनेकडे आहे. साताऱ्यामध्ये भाजपकडे उदयनराजे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र त्या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. पारंपारिक त्या जागेवर दावा आपलाच असल्याचे राष्ट्रवादीच म्हणणे आहे.
या सर्व गोंधळामुळेच महायुतीमधील जागा वाटप रखडले असल्याचे बोलले जात आहे. आता महाराष्ट्रातील भाजपची यादी नेमकी कधी जाहीर होती आणि कोणा-कोणाला उमेदवारी मिळू शकते, कोणा-कोणाचा पत्ता कट होऊ शकतो याची उत्तरे येत्या काही दिवसांतच मिळू शकतील.