सोलापूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या पक्षाला खिंडार; ‘या’ दोन माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होणार.
सोलापूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या पक्षाला खिंडार पडलं आहे. गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांचा भाजपा पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर आज बुधवार (दि. 29 ऑक्टोबर) रोजी पडदा पडला असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात प्रवेश झाला. माजी आमदार पाटील यांच्या सोबत लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, प्रकाश चवरे यांनी प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं.
या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. दरम्यान, येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकात भाजपचाच झेंडा फडकवू असा विश्वास माजी आमदार पाटील व माजी आमदार यशवंत माने यांनी व्यक्त केला. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात विधानसभा निवडणुकी अगोदर पासून वितुष्ट आले होते. जाहीर कार्यक्रमात दोघे ही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नव्हते.
बच्चू कडू यांनी आंदोलन स्थळ मोकळं करावं; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश
सावळेश्वर, ता. मोहोळ येथील एका कार्यक्रमासाठी माजी आमदार पाटील यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना आमंत्रित केले होते. त्या वेळेपासूनच माजी आमदार पाटील यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाचे वारे जोरदार वाहू लागले. विधानसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माजी आमदार पाटील विरोधी गटाला एकत्र करून मोहोळ तालुका संघर्ष समिती गठित करून मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी हजारो कोटीचा निधी आणणाऱ्या माजी आमदार यशवंत माने यांना पराभवाची चव चाखावयास लावली.
खा. शरद पवार पक्षाचे राजू खरे आमदार झाले. एवढे होऊनही उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी उमेश पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपवली, त्यामुळे माजी आमदार पाटील यांचा स्वाभिमान दुखावला. त्यामुळे भाजप प्रवेशाचे निश्चित झाले होते, मात्र वेळ व दिवस ठरावयाचा होता. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीत कोणाची ताकद किती असणार आहे हे समजणार आहे. ही एक प्रकारची सत्वपरीक्षा असल्याची चर्चा तालुक्यात आहे.
