Ramesh Bais : राज्यपाल बैस यांनी घेतली संपूर्ण शपथ मराठीमधून

Ramesh Bais : राज्यपाल बैस यांनी घेतली संपूर्ण शपथ मराठीमधून

मुंबई : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी राज्यापाल पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण शपथ मराठीमधून घेत आपला पदभार स्विकारला. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याआधी कोश्यारी वादग्रस्त ठरले होते. कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच सत्ताधारी भाजपला (BJP) पूरक भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप होता. महापुरुषांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात वादंग उठले होते. विरोधी पक्षांनी आंदोलने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभुमीवर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. यानंतर आता रमेश बैस राज्याचे राज्यपालपदी विराजमान झाले आहेत.

“निवडणुकीत जागा दाखवून देऊ…”, शिंदे गटाच्या जल्लोषावर अंबादास दानवेंची खोचक टीका

रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील रायपूर येथे झाला आहे. तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले बैस हे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांना नियुक्त करण्यात आले होते. त्रिपुरात (Tripura) दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube