भाजप युवा मोर्चाच्या जागर यात्रेचे अहिल्यानगर शहरात जोरदार स्वागत
शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी महाआरती करून यात्रेची पुढील वाटचाल सुरू केली.
Grand welcome in Ahilyanagar city : भाजप युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या ‘युवाशक्ती जागर यात्रे’ चे आज अहिल्यानगर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोहोचत असून, युवकांशी थेट संवाद साधत संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
अहिल्यानगर शहरात दाखल झालेल्या या यात्रेचे भाजप पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी महाआरती करून यात्रेची पुढील वाटचाल सुरू केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि युवकांशी संबंधित प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना महाडिक यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार ज्यांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्यांना नाही,” असे सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच त्यांनी “कोकरोच पार्टी” असा उल्लेख करत विरोधकांवर रोखठोक शब्दांत हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनावरही महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. हे आंदोलन जनतेच्या प्रश्नांसाठी नसून केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा “राजकीय स्टंट” असल्याची टीका त्यांनी केली.
राजकारणात मोठी खळबळ; उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, घडामोडींना वेग
यावेळी राज्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. युवा पिढीला ड्रग्जच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर महाविद्यालय स्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेत स्थानिक पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने मार्गदर्शन शिबिरे, व्यसनमुक्तीविषयक जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थ्यांशी संवाद आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेणे, सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि संघटनात्मक बळकटी साधणे हा ‘युवाशक्ती जागर यात्रा’चा मुख्य उद्देश असल्याचेही महाडिक यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.