भेसळ ओळखा, सुरक्षित अन्न निवडा; फूड सेफ्टी ऑन व्हील्स मोहिमेतून प्रशासनाकडून नागरिकांना मार्गदर्शन

बृहन्मुंबई परिसरात राबविण्यात आलेल्या ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या उपक्रमातून हजारो नागरिकांपर्यंत अन्न सुरक्षेचा संदेश पोहोचवण्यात आला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 71

Guidance for citizens from the administration : राज्यात अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि नागरिकांमध्ये सुरक्षित अन्नाबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. बृहन्मुंबई परिसरात राबविण्यात आलेल्या ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या उपक्रमातून हजारो नागरिकांपर्यंत अन्न सुरक्षेचा संदेश पोहोचवण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बृहन्मुंबई विभागाचे सहआयुक्त एम. एन. चौधरी यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण अर्थात एफएसएसएआयच्या संकल्पनेतून फूड सेफ्टी ऑन व्हील्स हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. 9 जून ते 15 जून या कालावधीत बृहन्मुंबई परिसरातील विविध सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, रेल्वे स्थानके आणि गर्दीच्या परिसरांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत विविध अन्नपदार्थांचे तब्बल 69 नमुने फिरत्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले. यामधून अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत नागरिकांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थी, नागरिक, अन्न विक्रेते आणि व्यावसायिकांशी संवाद साधत अन्न सुरक्षा नियम, अन्न साठवणूक, लेबलवरील माहिती, कालबाह्य अन्नपदार्थ टाळण्याचे महत्त्व आणि भेसळयुक्त अन्न ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

राहुरी पोटनिवडणूक, विधान परिषद आणि आता शिर्डी संस्थान; दरवेळी माझं नाव चर्चेत येतं आणि पत्ता कट होतो! सुजय विखेंचा मिश्किल टोला

दूध, मसाले, खाद्यतेल आणि इतर अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ ओळखण्यासाठी विशेष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. नागरिकांना घरच्या घरी करता येणाऱ्या प्राथमिक चाचण्यांची माहिती देऊन अन्नभेसळीविरोधात जागरूक करण्यात आले. याशिवाय विविध दूध संकलन केंद्रांनाही भेटी देण्यात आल्या. दूध नमुन्यांची तपासणी करताना दूधाची गुणवत्ता, शुद्धता आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच संबंधितांना अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना उत्पादन व कालबाह्यता दिनांक तपासावा, शिजवलेले अन्न योग्य तापमानात साठवावे, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि अन्न सुरक्षेसंदर्भातील तक्रारी संबंधित यंत्रणांकडे नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. फूड सेफ्टी ऑन व्हील्स हा उपक्रम केवळ आठवडाभरापुरता मर्यादित नसून भविष्यातही सातत्याने राबविला जाणार आहे. अधिकाधिक नागरिक, विद्यार्थी आणि अन्न व्यावसायिकांपर्यंत अन्न सुरक्षेचा संदेश पोहोचवून सुरक्षित आणि निरोगी समाज घडविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

follow us