..तर कार्यकर्ते मरतील; भाजप शिवसेना शिंदे गटाच्या युतीवर गुलाबराव पाटील यांचं धक्कादायक विधान
भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करतं, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.

महानगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. (BJP) राजकीय पटावर वाटाघाडी आणि वार प्रतिवार सुरू झाली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुका लढवल्या जाणार की? काही पक्ष स्वबळाचा नारा देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत बोलताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करतं, अशी सूचक टीका राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये केली आहे. त्याचबरोबर युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील, भाजप शंभर जागा लढेल तिथे आम्ही आमच्या ताकतीनुसार पन्नास जागा तरी लढूच, पण असं करू नका यामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान होईल, अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडली आहे.
मोदींना टाटा,बाय-बाय करा, ओबीसींचा घात भाजप अन् आरएसएसनेच केला; आंबेडकरांचा सल्ला
युती न झाल्यास कार्यकर्त्यांचं मोठं नुकसान होईल, ते ‘मरून जातील, त्यामुळे भाजपाने कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, लोकसभा विधानसभेला कार्यकर्ता काम करतो, त्यामुळे दोन-चार जागा इकडे तिकडे करा, पण कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी हीच निवडणूक असते, असं गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. लोक आता हुशार झाले आहेत. पहिल्यांदा निवडून येणं सोपं असतं, पण सलग तीन-चार वेळा निवडून येणारा नेता खरा असतो असंही ते म्हणाले आहेत.
शिवसेनेचं नुकसान संजय राऊत या एकट्या माणसामुळे झालं, अशी टीकाही त्यांनी यावेळी राऊतांवर केली. दरम्यान दुसरीकडे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. सर्व निवडणुका या महायुती म्हणूनच लढवणार आहोत, मात्र जिथे आपला चांगला उमेदवार असेल तिथे त्याचा बळी जाऊ देणार नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.