Haribhau Bagde : मोदींनी हरिभाऊंना विचारलं, तुम्हाला महाराष्ट्रा बाहेर जायचं आहे का..

Haribhau Bagde : मोदींनी हरिभाऊंना विचारलं, तुम्हाला महाराष्ट्रा बाहेर जायचं आहे का..

Haribhau Bagde New Governor of Rajasthan : सकाळीच मोदीजींचा फोन आला. “क्या हरिभाऊ कैसे हो?” “क्या चल रहा है?” मोदीजी म्हणाले. मला क्षणभर काहीच सुचेना. मी कसंबसं म्हणालो, “ठीक चल रहा है मोदीजी.” त्यावर ते म्हणाले “आपको महाराष्ट्र के बाहर जाना होगा.” मला काहीच कळेना. मी म्हणालो, “आप कहेंगे तो किधर भी जाऊंगा.” त्यावर मोदींनी मला राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करणार असल्याचं सांगितलं. घोषणा होईपर्यंत कुठेच काही बोलू नका असंही बजावलं. अशा पद्धतीनं कुणालाही सुगावा लागू न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या राज्यपालपदाची धुरा हरिभाऊ बागडे यांच्या हाती दिली. हा खास किस्सा हरिभाऊंनीच कथन केल्याचं आता समोर आलं आहे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (Draupadi Murmu) शनिवारी देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांची अदलाबदली केली. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठ नेत्यांची वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचाही (Haribhau Bagde) समावेश आहे. हरिभाऊंची राजस्थानच्या राज्यपालपदी (Rajasthan) नेमणूक करण्यात आली आहे.

खरंतर राजस्थान भाजपशासित राज्य. आधीच्या अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारचा पराभव करत भाजपने या राज्याची सत्ता काबीज केली. डिसेंबर 2023 मध्ये राज्यात भाजपचं सरकार आलं. सध्याचे राज्यपाल कलराज मिश्र यांचा कार्यकाळा 21 जुलै रोजी संपुष्टात आला होता. त्यांच्या जागी कोण असा प्रश्न होता. त्यावेळी मागील 65 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करत असलेल्या हरिभाऊ बागडेंचं नाव समोर आलं. वयाच्या बाराव्या वर्षापासून हरिभाऊ आरएसएससाठी काम करत आहेत. चौथीत होतो तेव्हापासून संघासाठी काम करत आहे असे हरिभाऊ आजही अभिमानाने सांगतात.

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार, वाचा सविस्तर यादी

सन 1980 मध्ये भाजप अस्तित्वात आला. पण त्यावर्षातील निवडणुकीत भाजपला मोठे हादरे बसले होते. त्यानंतर वाटलं की भाजपसाठी काम केलं पाहिजे. संघाबरोबरच भाजपसाठी काम करण्याची इच्छा मनात होतीच. मनातली इच्छा पूर्ण झाली आणि भाजपसाठी काम करू लागलो. ज्या ठिकाणी कुणीही जात नव्हतं अशा ठिकाणी जाऊन मी काम करत असे. हाच माझा स्वभाव होता. त्यामुळेच आज इथपर्यंत येऊ शकलो. पक्षानं जी कामं सांगितली ती केली. ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या त्याही पार पाडल्या. त्याचच फळ म्हणून आज राज्यपालपदी काम करण्याची संधी मिळाली, असे हरिभाऊंनी सांगितले.

घरोघर पेपर विकण्याचं काम

हरिभाऊंचं बालपण अत्यंत हलाखीत गेलं. घरी गरीबी होती. त्यांचे वडिल शेतकरी होते. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे घरच्यांना काहीतरी मदत व्हावी या हेतूने हरिभाऊंनी घरोघर वृत्तपत्र विक्रीचं काम केलं. नाना अस्सल हाडाचा शेतकरी असल्याचा अनुभव तु्म्हाला घ्यायचा असेल तर त्यांच्या घराचं कृषीयोग या नावावरुनच येईल.

राजकीय करिअर..

तसं पाहिलं तर आरएसएस मधूनच हरिभाऊ बागडे भाजपात आले. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1945 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता. हरिभाऊंना दहावीपर्यंतच शिक्षण घेता आलं. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. राजकारणात म्हटलं तर त्यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभ मतदारंसघातून 1985 मध्ये निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिले. हरिभाऊंना लोक नाना या नावाने देखील हाक मारतात.

हरिभाऊ बागडे महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. सन 2014 मध्ये जेव्हा राज्यात भाजपाचं सरकार आलं तेव्हा हरिभाऊंना राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर आता हरिभाऊंना थेट राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती मिळाली आहे. हरिभाऊ बागडे राजस्थान राज्याचे 45 वे राज्यपाल म्हणून आगामी काळात कामकाज करतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube