आता घरात जेवण करायला सांगा तेही करू, पण महायुतीला मतदान करा; अजितदादांचे मंत्री हे काय बोलले!
नुकत्याचा राज्याच्या अर्थसंकल्पात महिलावर्गाला आकर्षित करण्यासाठी महायुतीकडून लाडकी बहीण योजना आणण्यात आली आहे. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद बघता अजितदादांच्या एका मंत्र्यानं “सरकारने इतक्या योजना आणल्या आहेत, आता घरात जेवण करायला सांगा तेही करू, पण मतदान महायुतीला करा” असे विधान केले आहे. सध्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.
विधानसभेसाठी अजितदादांची जन सन्मान यात्रा
लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर महायुतीने आगामी विधानसभेसाठी आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा चंग बांधला आहे.
अजितदादांचे मंत्री हे काय बोलून गेले
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी “सरकारने इतक्या योजना आणल्या आहेत, आता घरात जेवण करायला सांगा तेही करू, पण मतदान महायुतीला करा”, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते रविवारी एका कर्याक्रमात बोलत होते.
मुश्रीफांनी वाचला योजनांचा पाढा
पुढे बोलताना हसन मुश्रीफ यांनी महायुती सरकारने आणलेल्या योजनांचा पाढचा वाचला ते म्हणाले की, “केसरी आणि पिवळ्या रेशन कार्डवर मोफत धान्य देण्याची योजना सरकारने सुरु ठेवलेली आहे. तसेच प्रत्येक सणाला सहा वस्तू फक्त 100 रुपयांना सरकार देतं. तसंच येणाऱ्या गणपती उत्सवालाही आता चणा डाळ, साखर, रवा, तेल, हे सुद्धा आपण देत आहोत. त्यामुळे सरकारने एवढ्या मोठ्या योजना आणल्या आहेत. आता घरात जेवण करायला सांगा तेही आम्ही करू, पण मतदानावेळी फक्त महायुतीचं बटणं दाबा”, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.