सावधान! तुमच्या आवडीचे ‘कांदे-पोहे’ आरोग्यासाठी घातक? संजीव कपूर यांचा खळबळजनक खुलासा…

Sanjeev Kapoor On Poha Breakfast सकाळच्या घाईत वाफाळलेले पोहे आणि वरून पिळलेलं रसदार लिंबू आ हा हा... नुसतं ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना? पण

  • Written By: Published:
सावधान! तुमच्या आवडीचे 'कांदे-पोहे' आरोग्यासाठी घातक? संजीव कपूर यांचा खळबळजनक खुलासा...

Sanjeev Kapoor On Poha Breakfast : सकाळच्या घाईत वाफाळलेले पोहे आणि वरून पिळलेलं रसदार लिंबू आ हा हा… नुसतं ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना? पण, जरा थांबा बहुतांश भारतीयांचा ‘नॅशनल नाश्ता’ असलेल्या पोह्यांबाबत चवीचे बादशाह आणि पद्मश्री विजेते सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांनी असे काही विधान केले आहे. ज्यामुळे पोहे प्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला आहे. “पोहे हेल्दी नसतातच,” असं रोखठोक विधान त्यांनी केलं आहे. असे विधान त्यांनी का केले याबाबतच जाणून घेऊया…

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर स्वयंपाकातील तेल 10 टक्क्यांनी कमी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

नेमकं काय म्हणाले संजीव कपूर?

स्मिता प्रकाश यांच्या’ANI’ पॉडकास्टमध्ये गप्पा मारताना संजीव कपूर यांनी अनेक खाद्यभ्रम मोडीत काढले. गप्पांच्या ओघात जेव्हा पोह्यांचा विषय निघाला तेव्हा कपूर म्हणाले की, “लोकांना वाटतं पोहे खूप पौष्टिक आहेत, पण खरं सांगायचं तर ते फक्त ‘कम्फर्ट फूड’ आहे. पण हे बघणाऱ्या सर्वांसाठी हेल्दी नाहीये. जर भात आरोग्यासाठी वाईट असेल, तर पोहे त्यापेक्षाही जास्त खराब आहे असे कपूर यांनी सांगितले. कपूर यांच्या या एका विधानानंतर सोशल मीडियावर जणू ‘कांदा-पोहे’ युद्धच पेटलं आहे. एवढेच काय तर, या व्हिडिओवर 100 हून अधिक प्रतिक्रियादेखील व्यक्त करण्यात आल्या आहेत.

पोह्यांमध्ये नक्की ‘खोट’ काय?

संजीव कपूर यांनी पोह्यांबाबत केवळ विधान केलं नाही, तर त्यामागचं लॉजिकही सांगितलंय. ते म्हणाले की, सकाळी रिकाम्या पोटी पोहे खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी (Insulin Spike) अचानक वाढते, जी आरोग्यासाठी चांगली नाही. शिवाय पोहे म्हणजे निव्वळ कार्बोहायड्रेट्स असून, यात शरीराला आवश्यक असणारं प्रोटिन (प्रथिने) नाममात्र असतं. त्यामुळे पोहे खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं खरं, पण शरीराला जी ऊर्जा हवी असते, ती यातून पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचे कपूर म्हणाले.

‘खईके पान बनारसवाला’चा कॉर्पोरेट अवतार! MBA पदवीधराने २ लाखांत उभं केलं ७ कोटींचं साम्राज्य’

पोहे प्रेमींनो, घाबरू नका… उपाय आहे…

संजीव कपूर यांच्या त्या एका ‘स्पायसी’ विधानानंतर अनेकांच्या मनात धडकी भरली असेल. पण पोहे प्रेमींनो, लगेच कढई बाजूला ठेवण्याची गरज नाही. संजीव कपूर यांनी पोह्यांच्या चवीवर नाही, तर त्यातून मिळणाऱ्या पोषणावर बोट ठेवलंय. त्यामुळे आता प्रश्न उरतो की, मग नाश्त्याला नक्की खायचं काय? तर, आहारतज्ज्ञांच्या मते, पोह्यांचा ‘निकाल’ लावण्यापेक्षा त्यांचा ‘गेटअप’ बदलणं हाच सर्वात हुशारीचा मार्ग आहे. पोह्यांना ‘हेल्दी’ कसं बनवायचं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे,  पोह्यांमध्ये फक्त कांदा न टाकता त्यात गाजर, सिमला मिरची, मटार आणि कोबी यांचा सढळ हाताने वापर करा. यामुळे पोह्यांमधील ‘फायबर’चं प्रमाण वाढेल.

याशिवाय तुम्ही पोहे बनवताना त्याला प्रोटिनचा तडका देऊ शकता कारण, पोहे हे मुळात कार्बोहायड्रेट्स असतात. त्याला संतुलित करण्यासाठी त्यात पनीरचे छोटे तुकडे, सोया चंक्स किंवा मोड आलेली कडधान्ये (Sprouts) मिसळा. याशिवाय तुम्ही पोह्यांसोबत एक वाटी ताजे दही खाल्ल्यास अन्नाचे पचन चांगले होते आणि इन्सुलिन स्पाइकवरही नियंत्रण मिळवता येते. पण, जर तुम्ही चवीसाठी पोह्यांवर मूठभर शेव किंवा फरसाण टाकत असाल तर, ही सवय आरोग्यासाठी ‘स्लो पॉयझन’ ठरू शकते. तळलेली शेव पोह्यांची सर्व पौष्टिकता नष्ट करते. त्यामुळे ही सवय आजच सोडा असे कपूर नाही तर, आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

अस्सल महाराष्ट्रीयन ‘कांदे-पोहे’ असोत किंवा मध्य प्रदेशातील ‘पोहे-जलेबी’, भारतीयांसाठी ही केवळ डिश नसून एक ‘इमोशन’ आहे. संजीव कपूर यांनी दिलेला सल्ला हा या इमोशनवर घाला नसून, आरोग्यासाठी दिलेला एक मोलाचा इशारा आहे. तर मग काय ठरलं? उद्या सकाळी पुन्हा तेच ‘कार्ब-लोडेड’ पोहे की संजीव कपूर यांच्या सल्ल्यानुसार नवा ‘हेल्दी’ अवतार? ठरवा तुमचं तुम्हीच….

 

follow us