जिल्ह्याच्या पालकत्व मलिदा खाण्यासाठी की जिल्ह्याच्या मालकीसाठी?, वडेट्टीवारंचा महायुतीवर घणाघात

  • Written By: Published:
जिल्ह्याच्या पालकत्व मलिदा खाण्यासाठी की जिल्ह्याच्या मालकीसाठी?, वडेट्टीवारंचा महायुतीवर घणाघात

Vijay Wadettiwar on Guardian Ministers : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी (Guardian Ministers) रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला. आदिती तटकरे यांना रायगडचं तर गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, रायगडचं पालकमंत्रिपद मिळावं यासाठी भरत गोगावले तर, नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दादा भुसे आग्रही होते. यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हमला चढवला आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी पालकत्व हवे की मलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी? प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरसुद्धा महायुती सरकारची आज ही अवस्था आहे. ५० दिवसांनंतर जिल्ह्याला या सरकारने पालकमंत्री दिले. त्यात ही आता एका रात्रीत पालकमंत्री बदलण्याची नामुष्की सरकारवर आली आहे असा थेट वार वडेट्टीवार यांनी केला आहे.

आधी मंत्रीमंडळ विस्तार, नंतर खाते वाटप, आता पालकमंत्री जबाबदारी देण्यासाठी विलंब झाला आणि दिलेले पालकमंत्री बदलण्याची वेळ आली, हे फक्त एका कारणासाठी ते म्हणजे मोठा मलिदा कोणाला मिळणार? जिल्ह्याचा व जनतेचा विकास राहिला दूर, आधी स्वतःचा विकास करण्यासाठी महायुतीत धडपड सुरू आहे असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.

पालकमंत्री पद जाहीर होऊनही गोंधळ काही थांबेना; रायगड अन् नाशिकच्या नियुक्तीला स्थगिती

मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना व भाजपा आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रिपद आलं आहे.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही तटकरे यांना पद मिळालं यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली होती. तसेच गोगावले समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube