जागा वाटपाचा प्रश्न आता दिल्लीत! फडणवीसांसह सहा नेत्यांना अमित शाह PM मोदींसमोर बसवणार
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा (Lok Sabha Election) जागा वाटपाचा मुद्दा सोडविण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना मुंबईत अपयश आले आहे. त्यामुळे आता हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्यासमोर दिल्लीत सोडविण्याचा प्रयत्न होणार आहे. (issue of seat allocation in Maharashtra is being discussed by Prime Minister Narendra Modi and party president J.P. An attempt will be made to solve it before J. P. Nadda.)
दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी काल (5 फेब्रुवारी) रात्री महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर आता शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना दिल्लीला घेऊन जाणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीला चार अन् शिवसेनेला सात जागा देण्यास भाजप तयार; महायुतीत धुसफूस वाढणार
भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यामागे अद्याप महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी अंतिम झाली नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने भाजपकडे गतवेळी लढलेल्या सर्व 22 जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीने 10 जागांची मागणी केली आहे. या मागणीनुसार भाजपने जागा वाटप केल्यास भाजपच्या वाट्याला अवघ्या 16 जागा येतात.
मात्र भाजपने 34 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. तर सात जागा शिवसेनेला, चार जागा राष्ट्रवादीला, एक राष्ट्रीय समाज पक्षाला आणि एक रयत क्रांती संघटनेला देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र या जागा वाटपाला शिवसेना आणि राष्ट्रवादीने कडाडून विरोध केला आहे.
राष्ट्रवादीची अन् शिवसेनेची मागणी :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या किमान 10 जागांची मागणी केली आहे.
तर शिवसेनेने गतवेळी लढविलेल्या मुंबईतील तीन, ठाणे, कल्याण, पालघर, मावळ, शिरुर, शिर्डी, बुलढाणा, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, रामटेक, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ-वाशिम आणि अमरावती या जागांची मागणी केली आहे.