राष्ट्रवादीला चार अन् शिवसेनेला सात जागा देण्यास भाजप तयार; महायुतीत धुसफूस वाढणार
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024 ) भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चार आणि शिवसेनेला (Shivsena) सात जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाला (RSP) एक आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या रयत क्रांती संघटनेलाही एक जागा देण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दहा तर शिवसेनेने 22 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.
भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यामागे अद्याप महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी अंतिम झाली नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने भाजपकडे गतवेळी लढलेल्या सर्व 22 जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीने 10 जागांची मागणी केली आहे. या मागणीनुसार भाजपने जागा वाटप केल्यास भाजपच्या वाट्याला अवघ्या 16 जागा येतात. (For the Lok Sabha elections, BJP has prepared to give four seats to NCP and seven seats to Shiv Sena in Maharashtra.)
2019 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉप 5 अन् काठावर निवडून आलेले टॉप 5 खासदार…
मात्र भाजपने 34 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. तर सात जागा शिवसेनेला, चार जागा राष्ट्रवादीला, एक राष्ट्रीय समाज पक्षाला आणि एक रयत क्रांती संघटनेला देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र या जागा वाटपाला शिवसेना आणि राष्ट्रवादीने कडाडून विरोध केला आहे.
राष्ट्रवादीची अन् शिवसेनेची मागणी :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या किमान 10 जागांची मागणी केली आहे.
तर शिवसेनेने गतवेळी लढविलेल्या मुंबईतील तीन, ठाणे, कल्याण, पालघर, मावळ, शिरुर, शिर्डी, बुलढाणा, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, रामटेक, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ-वाशिम आणि अमरावती या जागांची मागणी केली आहे.