2019 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉप 5 अन् काठावर निवडून आलेले टॉप 5 खासदार…
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) हे प्रमुख पक्ष आहेत. तर महायुतीमध्ये भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे. कादगावर भाजपने (BJP) महायुतीच्या माध्यमातून 45+ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर विविध सर्व्हेंमध्ये महाविकास आघाडी 38 हुन अधिक जागा जिंकू शकते असा अंदाज बांधला जात आहे. (Top 5 MPs in Maharashtra Lok Sabha Elections 2019 with the highest number of votes and top 5 MPs who were elected with less votes…)
आता कोणत्या मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार हे तर निकालानंतरच कळून येऊ शकेल. मात्र 2019 मध्ये पाच मतदारसंघ असे होते जिथे भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी एकहाती बाजी मारली होती. तर 34 मतदारसंघ असे होते जिथे भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी एक लाख पेक्षा अधिक मताधिक्य घेतले होते. अन्य 14 मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतले होते. तर दोन ठिकाणी राष्ट्रवादीने, एका ठिकाणी काँग्रेसने आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने एक लाखांहुन कमी मताधिक्य मिळविले होते. यातही पाच मतदारसंघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती.
पाहुया 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळविणारे टॉप 5 अन् काठावर निवडून आलेले टॉप 5 खासदार…
सर्वाधिक मताधिक्य मिळविणारे टॉप 5 खासदार :
उत्तर मुंबईतून भाजपच्या गोपाळ शेट्टींचा 4 लाख 65 हजार 247 मतांनी विजय झाला होता. सलग दुसऱ्यांदा त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेण्याची किमया साधली होती. गोपाळ शेट्टी यांना 7 लाख 06 हजार 678 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना केवळ 2 लाख 41 हजार 431 एवढी मते मिळाली होती. या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीच्या सुनिल थोरात यांना मिळाली होती.
मोठी बातमी : नक्षलवादी प्रकरणात DU चे माजी प्राध्यापक साईबाबांसह 5 जण निर्दोष; जन्मठेपही रद्द
महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य ठाण्यात शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना मिळाले होते. विचारे यांना 7 लाख 40 हजार 969 तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा 3 लाख 28 हजार 824 मते मिळाली होती. विचारे यांनी परांजपेंचा 4 लाख 12 हजार 145 मतांनी पराभव केला होता.
2019 च्या लोकसभेला तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उन्मेष पाटील यांनी घेतले होते. खासदार पाटील यांना 7 लाख 13 हजार 874 मते मिळाली होती. तर विरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना अवघ्या 3 लाख 02 हजार 257 मतांवर समाधान मानावे लागले होते.पाटील यांनी 4 लाख 11 हजार 617 मतांनी जळगावचे मैदान मारले होते.
टॉप 5 मताधिक्य मिळविणाऱ्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचाही समावेश आहे. शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून तब्बल 3 लाख 44 हजार 343 मतांनी विजय संपादन केला होता. श्रीकांत शिंदे यांना 5 लाख 59 हजार 723 मते मिळाली होती. तर विरोधातील राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना 2 लाख 15 हजार 380 मते मिळाली होती.
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातही भाजपला एकहाती विजय मिळला होता. रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांना 6 लाख 55 हजार 386 मते मिळाली होती. तर विरोधातील काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांना 3 लाख 19 हजार 504 मते मिळाली होती. रक्षा खडसे यांनी तब्बल 3 लाख 55 हजार 882 मतांनी पाटील यांचा पराभव केला होता. आता हेच उल्हास पाटील काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आले असून त्यांच्या मुलीला आता रावेरमधून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
टॉप 5 काठावर निवडून आलेले खासदार :
छत्रपती संभाजीनगर – या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युतीचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता. जलील यांना 3 लाख 89 हजार 42 तर खैरेंना 3 लाख 84 हजार 550 मते पडली होती. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी 2 लाख 83 हजार 798 मते मिळविली होती. त्यामुळे खरैंचा विजय अवघड झाला होता. अखेरीस 4 हजार 492 मतांनी जलील विजयी झाले होते.
रायगड – या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे 4 लाख 86 हजार 968 मते घेऊन विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे खासदार राहिलेल्या अनंत गीते यांचा 31 हजार 438 मतांनी पराभव केला होता. गीते यांना 4 लाख 55 हजार 530 मते पडली होती.
“खबरदार, माझ्या वडिलांचा एकेरी भाषेत उल्लेख केला तर”… हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचा मित्रपक्षांना इशारा
अमरावती – या मतदारसंघात अपक्ष उमेदवार नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळविला होता. तिथे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसुळ होते. इथे नवनीत राणा यांना 5 लाख 10 हजार 947 मते पडली होती तर अडसुळांना 4 लाख 73 हजार 996 मते पडली होती. राणा यांनी अडसूळ यांचा 36 हजार 951 मतांनी पराभव केला होता.
नांदेड – शिवसेनेतून आयात केलेले भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. चिखलीकर यांना निवडणुकीत 4 लाख 86 हजार 806 मते तर अशोक चव्हाणांना 4 लाख 46 हजार 658 मते पडली होती. चिखलीकर यांचा 40 हजार 138 मतांनी विजय झाला होता.
परभणी – या मतदारसंघातही शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कांटे की टक्कर झाली होती. शिवसेनेच्या संजय जाधव यांना 5 लाख 38 हजार 941 मते घेऊन निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांचा 42 हजार 199 मतांनी पराभव केला होता. विटेकर यांना 4 लाख 96 हजार 742 मते पडली होती.