Justice Alok Aradhe : न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
Justice Alok Aradhe : तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे मंगळवारी (दि. 21) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी न्या. आलोक आराधे (Justice Alok Aradhe) यांना पदाची शपथ दिली. शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्या. आराधे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) , कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.
सुरुवातीला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्या. आलोक आराधे यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
न्या. आलोक आराधे यांचा परिचय
न्या. आलोक अराधे यांचा जन्म 13 एप्रिल 1964 रोजी रायपूर, छत्तीसगड येथे झाला. त्यांनी 12 जुलै 1988 रोजी वकील म्हणून नोंदणी केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात त्यांनी नागरी आणि घटनात्मक प्रकरणांवर काम केले. एप्रिल 2007 मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. 29 डिसेंबर 2009 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश व 15 फेब्रुवारी 2011 रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले.
न्या. आराधे 20 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि 11 मे 2018 रोजी हंगामी मुख्य न्यायमूर्ती झाले. 17 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती. 3 जुलै 2022 ते 14 ऑक्टोबर 2022 त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पहिले.
सहा वर्षात 655 फेक एन्काऊंटर पण किती पोलिसांना शिक्षा? ‘हे’ आहे आकडे
तर 19 जुलै 2023 रोजी त्यांची तेलंगाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली. न्या. आलोक अराधे यांनी मध्यस्थी व सामंजस्य केंद्रे, न्यायिक अकादमी, तसेच कायदेशीर सेवा प्राधिकरणांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या विविध अंगांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.